Tue, Mar 19, 2019 10:02होमपेज › Ahamadnagar › दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राहुरीत आज सरकारविरोधात ‘हल्लाबोल’ आंदोलन

दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राहुरीत आज सरकारविरोधात ‘हल्लाबोल’ आंदोलन

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 11:08PMराहुरी  : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राष्ट्रवादीचा सरकारविरोधात हल्लाबोल सुरु आहे. त्या पार्श्‍वभूमिवर राहुरी येथे आज गुरुवारी सायंकाळी 6 वा. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खा. सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, दिलीपराव वळसे पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी खा. प्रसादराव तनपुरे आदींच्या उपस्थितीत हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, या आंदोलनातून राहुरी विधानसभा मतदार संघात प्राजक्त तनपुरे यांच्या पंखांना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून एकप्रकारे बळ मिळणार असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.

एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या राहुरी विधानसभा मतदार संघात दोन-तीन पंचवार्षिकपासून चित्र बदलले आहे. यामध्ये मतदार संघाचे विभाजन हाच खरा कळीचा मुद्दा आहे. असे असले तरी माजी खा. प्रसादराव तनपुरे यांनी जनसेवेचे व्रत सांभाळताना राष्ट्रवादीची ताकद कमी होऊ दिली नाही. स्व. बाबुराव दादा तनपुरे व त्यानंतर माजी खा. प्रसादराव तनपुरे यांना मानणारा मोठा गट सदैव त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलेला आहे. तिसर्‍या पिढीतही हा गट युवानेते प्राजक्त तनपुरे यांच्यामागे ताकद उभी करून सज्ज आहे. राहुरी कृषि उत्पन्न बाजार समिती, राहुरी कारखाना निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वगुणांची चूणूक सर्वांना पहायला मिळाली.

राहुरी कारखाना निवडणुकीत राज्याचे विरोधी पक्षनेते ना. विखे व डॉ. सुजय विखे यांच्या झंझावाताला विरोध करताना प्राजक्त तनपुरे यांनी गटागटात घेतलेल्या बैठका, मोर्चेबांधणी आणि व्यूहरचनेमुळे चुरशीची निवडणूक झाली. तनपुरे गटाचे अनेक उमेदवार थोड्याफार मतांनी पराभूत झाल्याने विखे गटाचाही भ्रमाचा भोपळा तनपुरेंनी फोडला. तेव्हापासून शिवाजीराव गाडे यांना सोबत घेवून प्राजक्त तनपुरेंनी अभ्यासपूर्ण राजकीय वाटचाल सुरु केली. त्यानंतर लागलीच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत माजी खा. तनपुरे, माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे व बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राजक्त तनपुरेंनी ना. विखे व आ. कर्डिले गटाला पराभूत करून लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकली. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही तनपुरेंनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणुकीची यशस्वी मोर्चेबांधणी करून जिल्हा परिषदेचे दोन गट काबीज केले तर पंचायत समितीची सत्ता ताब्यात घेवून पुन्हा एकदा विखे व कर्डिले गटाला धोबीपछाड दिली. 

अशाप्रकारे विविध निवडणुकांमधून प्राजक्त तनपुरेंनी राहुरीत राष्ट्रवादीचे गेलेले वैभव परत मिळवून देण्याची श्रेष्ठींचे डोळे दिपावणारी कामगिरी केली आहे. राजकारण करत असताना त्यांनी सत्तेचा समाजकारणासाठी मोठा वापर केला. अपंगांसाठी 3 टक्के निधी खर्च केल्याने राज्यात राहुरी नगरपालिकेचा गौरव झाला. त्यातून मासरे कुटुंबाला त्यांनी दिलेले हक्काचे घर राज्यात कुतुहलाचा विषय ठरला. याशिवाय स्वच्छता अभियानातही त्यांनी आपले दूरदृष्टी व्हिजन वापरून राज्यातील क्रमवारीत गरुडभरारी घेतली आहे. राहुरी ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी त्यांनी मंत्रालयात पाठपुरावा केला तसेच प्रसंगी उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले. परिणामी, आरोग्यमंत्र्यांनी याची दखल घेवून 17 कोटींचा निधी मंजूर केला आहे.  

रूग्णालयाच्या इमारतीसाठी जागा नसल्याने त्याकामीही प्राजक्त तनपुरेंनी पुढाकार घेवून पालिकेची जागा उपलब्ध करून दिली आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नातही प्राजक्त तनपुरे नेहमीच पुढे राहिलेले आहेत. प्रसाद शुगरच्या माध्यमातून बंधारे दुरुस्ती असेल किंवा जलसंधारणाची इतर कामे त्यांनी हाती घेवून शेतकर्‍यांना सहकार्य केले आहे. ऊस तोडणीतही कोणताही दुजाभाव न करता प्रसाद शुगरने शेतकर्‍यांचा सर्व ऊस जाईपर्यंत ऊस तोडणी बंद करणार नसल्याची ग्वाही दिल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी हा खासगी नव्हे तर सहकारी कारखाना वाटू लागला आहे. पक्षाचे पाठबळ नसतानाही आरडगाव, मानोरी, तांदूळवाडी, कोंढवड, शिलेगाव, उंबरे, ब्राम्हणी तसेच बा. नांदूर, ताहराबाद, म्हैसगाव, डिग्रस इत्यादी गावांमध्ये तनपुरेंनी अनेक कामे उभारून कार्यकर्ते व शेतकर्‍यांचा विश्‍वास संपादन केला आहे. 
शेतकरी आंदोलनातही प्राजक्त तनपुरे मागे नव्हते. पोलिसांनी अटक केलेल्या शेतकर्‍यांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी प्राजक्त तनपुरेंनी पोलिस स्टेशनवर विशाल मोर्चा नेला होता.

तसेच आमरण उपोषण करून प्रशासनाला गुन्हे मागे घेण्यास भाग पाडले होते. भिमा कोरेगावमुळे राज्य पेटले असताना राहुरी मात्र शांत होती. येथे प्राजक्त तनपुरे यांनी सर्वच जातीधर्मातील लोकांना विश्‍वासात घेत परिस्थिती शांत ठेवली होती. अनेकदा छोट्यामोठ्या घटनानंतर दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर माजी खा. तनपुरे व प्राजक्त तनपुरे यांच्या शब्दावर वातावरण निवळत असल्याने येथील व्यापारी, उद्योजकही तनपुरेंना मानतात. तसेच राहुरीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तनपुरेंनी वेळोवेळी आंदोलने मोर्चे काढून प्रशासनावर दबदबा कायम ठेवल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यानंतर पाटपाणी, कर्जमाफी असो की बोंडअळीचे पंचनामे, इत्यादीसाठी तनपुरेंनी पुढाकार घेवून शेतकर्‍यांना लाभ मिळवून देण्याचा प्रामणिक प्रयत्न केला आहे. 

एकीकडे, लोकप्रतिनिधींच्या पक्षाची राज्यात व केंद्रातही सत्ता असल्याने त्यांच्याकडून जनतेला खूप अपेक्षा होत्या. मात्र लोकप्रतिनिधींना त्यामध्ये अपयश आल्याने मतदार संघात संतापाची लाट आहे. सरकारची चुकीचे धोरणेही त्यात भर घालणारी आहेत. ही संधी साधून प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीसह नगर व पाथर्डी तालुक्यातील गावांमध्येही विकासकामे, अर्थसहाय्य तसेच जनसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होवून मोठा जनसंपर्क वाढवला आहे. यंदा शिवाजीराव गाडेही त्यांच्यासोबत आहेत. हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने प्राजक्त तनपुरे यांनी गावोगावी बैठका घेवून विधानसभेची तयारीही केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता तनपुरेंना ताकद दिल्यास राहुरी मतदार संघात प्राजक्त तनपुरे हे निश्‍चितच राष्ट्रवादीची विजयी पताका फडकावील, असेे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे.