होमपेज › Ahamadnagar › बाजार समितीच्या संचालकावर जीवघेणा हल्ला

बाजार समितीच्या संचालकावर जीवघेणा हल्ला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पाथर्डी : शहर प्रतिनिधी 

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माणिकदौंडी गावचे माजी सरपंच संपत गायकवाड यांचेवर शुक्रवारी(दि.24) दुपारी न्यायालयासमोर राष्ट्रीय महामार्गावर कुर्‍हाडीने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. जखमी गायकवाड यांच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयित आरोपी शंकर देविदास काळे स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समजते.

भरदुपारी झोला फिल्मीस्टाईल हल्ला बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा हजारोंची गर्दी जमली. संशयित व जखमी गायकवाड यांच्यात गेल्या काही दिवसांपासून बेबनाव होता. परिसरातील काही लोकांनी दोन्ही बाजूंमध्ये समेट घडवण्याचा यापूर्वी प्रयत्न केला. गेल्या तीन दिवसांपासून संशयिताकडून गायकवाड यांचा शोध सुरू होता. शुक्रवारी दुपारी कोर्टासमोर गायकवाड यांना बघताच त्यांच्यावर मिरची पूड फेकण्यात आली. ते खाली पडल्यावर त्यांच्यावर कुर्‍हाडीने वार केला. डोक्याला मागील बाजूस घाव बसल्यावरही गायकवाड यांनी कुर्‍हाड हातात घेत सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्या पाठोपाठ आरोपी सुद्धा पोलिस स्टेशनमध्ये पोहचल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.

घटनेबाबत माहिती मिळेपर्यंत सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी खासगी वाहनातून गायकवाड यांना उपजिल्हा रुणालयात नेले. अतिरिक्त रक्तस्त्राव व मोठी जखम झाल्याने स्थानिक डॉक्टरांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यास सांगितले. याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने घटनेचा अधिकृत तपशील समजू शकला नाही. या घटनेने माणिकदौंडी  परिसरात तणाव पसरला आहे.