Tue, Mar 19, 2019 03:12होमपेज › Ahamadnagar › एसपी ऑफिस तोडफोड; ‘चार्जशीट’बाबत संभ्रम!

एसपी ऑफिस तोडफोड; ‘चार्जशीट’बाबत संभ्रम!

Published On: Jul 05 2018 1:36AM | Last Updated: Jul 05 2018 12:53AMनगर : प्रतिनिधी

पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला व तोडफोड प्रकरणाला शुक्रवारी (दि. 6) 90 दिवस पूर्ण होत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होणे आवश्यक असते. मात्र, या प्रकरणातील दोषारोपपत्र कधी दाखल होणार याबाबत संभ्रम आहे. या गुन्ह्यातील बहुतांश आरोपी जामिनावर असल्याने चार्जशीट दाखल होण्यास उशीर होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

केडगाव येथे 7 एप्रिल रोजी सायंकाळी दोघा शिवसैनिकांचे हत्याकांड घडले. त्यावेळी आ. संग्राम जगताप यांना चौकशीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले होते. आ. जगताप यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून, त्यांना सोडून देण्याची मागणी करत जगताप समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात अक्षरशः धुडगूस घातला होता. यावेळी पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करत आ. संग्राम जगताप यांना पळवून नेण्यात आले होते. कार्यालयाचे दरवाजे लाकडी दांडक्याने तोडून, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले होते.

पोलिस अधीक्षक कार्यालयात अनधिकृत प्रवेश करून, बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली. पोलिस नाईक संदीप घोडके यांना मारहाण झाली. घोडके यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आ.शिवाजी कर्डिले, आ. अरुण जगताप, माजी आ. दादाभाऊ कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, सचिन जगताप, स्व. कैलास गिरवले, कुमार वाकळे, निखिल वारे यांच्यासह 250 ते 300 जणांवर भा.दं.वि. कलम 353, 332, 143, 147, 148, 149, 452, 427, 323, 504, सार्वजनिक विद्रुपीकरण कलम 3, 7 सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी आरोपी असलेल्या कैलास गिरवले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील अनेक आरोपींनी नंतर पोलिस ठाण्यात हजर होत शरणागती पत्करली. अनेकांना पोलिस कोठडी, न्यायालयीन कोठडीनंतर जामीन मिळाला. आ. अरुण जगताप यांच्यासह काही आरोपी अद्यापही पसार आहे. थेट पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करून चौकशीसाठी आणलेल्याला पळवून नेण्यासारखी गंभीर घटना घडलेली असतांना, अनेक आरोपी पोलिसांना सापडलेले नाहीत. त्यातच वेळेत दोषारोपपत्र दाखल होण्याची गरज असताना उशीर होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

गुन्ह्यात नंतर वाढविली तीन कलमे

आ. संग्राम जगताप यांना पळवून नेल्याप्रकरणी आ. अरुण जगताप व इतर आरोपींवर दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी आणखी तीन कलमांची नंतर भर घातली. त्यात आ. संग्राम जगताप यांना पोलिसांच्या कायदेशीर रखवलीतून घेऊन गेल्याप्रकरणी कलम 225, जमावास प्रोत्साहन देत दंगा घडवून आणला म्हणून कलम 109 व पोलिसांनी जमलेल्या लोकांना निघून जाण्याचे सांगितल्यानंतरही निघून न जाता पोलिसांच्या अंगावर धावून गेल्यावरून कलम 152 लावण्यात आलेले आहे.