होमपेज › Ahamadnagar › मोदी सरकारविरुद्ध आज हल्लाबोल!

मोदी सरकारविरुद्ध आज हल्लाबोल!

Published On: May 23 2018 1:06AM | Last Updated: May 22 2018 10:57PMनगर : प्रतिनिधी

मोदी सरकारच्या अयशस्वी कारभारविरुद्ध भाकपच्या वतीने आज (दि.23) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘मोदी सरकार के चार साल पोल खोल हल्लाबोल आंदोलन’ करण्यात येणार असल्याची माहिती भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे यांनी दिली. सर्व डावे पक्ष, जनसंघटना, धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी विविध संघटना या आंदोलनात सहभागी होऊन मोदी सरकार विरुद्ध निदर्शने करणार आहेत. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सरकारला सत्तेवर येऊन चार वर्षे पूर्ण झाले. मात्र, निवडणुकीच्या काळात काढलेल्या जाहीरनाम्यातील एकही आश्‍वासन या सरकारला पूर्ण करता आले नाही. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करणार, दरवर्षी 2 कोटी रोजगार उपलब्ध करणार, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करणार, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करणार, राज्य भ्रष्टाचारमुक्त करणार, स्विस बँकेतील काळा पैसा बाहेर काढणार आणि भारतातील जनतेसाठी ‘अच्छे दिन’ आणणार, अशी अनेक आश्‍वासने या सरकारने दिली होती. परंतु, प्रत्यक्षात तसे घडले नाही. फक्त भाजप व त्यांच्या आमदार, खासदार, मंत्र्यांनाच ‘अच्छे दिन’ आले आहेत.

नोटाबंदीमुळे हातातील रोजगार गेला. कामगार कायदे शिथिल केल्यामुळे कंपनी मालकांना कुठलेही बंधन राहिले नाही. कायमस्वरूपी कामगारांना जबरदस्तीने स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली. कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले. कंत्राटी पद्धतीमुळे ठेकेदारी पोसली व बेरोजगारी वाढली. जीएसटीमुळे छोटे उद्योगधंदे व व्यापारी अडचणीत आले. चार वर्षांत कमालीची इंधन दरवाढ झाली. सर्वच वस्तूंचे दर वाढले, महागाईने गोरगरिबांचे कंबरडे मोडले. गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे अल्पसंख्याकांवरील हल्ले वाढले. दलित व महिलांवरील अत्याचारांत वाढ झाली. भारतीय राज्यघटना पायदळी तुडवून अनेक निर्णय घेतले गेले. त्यामुळे जनतेमध्ये या सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष पसरला आहे.

भाजपच्या चार वर्षांच्या सत्ताकाळात त्यांनी कोणती चांगली कामे केली, त्याचा जाब विचारण्यासाठी देशभर हे आंदोलन  करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनात सर्व डावे पक्ष, धर्म निरपेक्ष व लोकशाहीवादी विविध संघटना व समविचारी कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाकपच्या वतीने करण्यात आले आहे.