होमपेज › Ahamadnagar › मारहाण करणार्‍या माजी सभापतीसह तिघांना शिक्षा

मारहाण करणार्‍या माजी सभापतीसह तिघांना शिक्षा

Published On: Aug 05 2018 1:28AM | Last Updated: Aug 05 2018 1:28AMनगर : प्रतिनिधी

मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती गहिनीनाथ जगन्नाथ शिरसाठ  (33), त्याचे भाऊ अशोक शिरसाठ (40) व राजेंद्र शिरसाठ (28) या तिघांना एक वर्ष सक्‍तमजुरीची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बांबर्डे यांनी ठोठावली आहे.

पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानूर गावामध्ये दि.3 एप्रिल 2014 रोजी शहा-शरीफ बाबा देवस्थानची यात्रा होती. या यात्रेत सलिम रज्जाक शेख आणि अशोक शिरसाठ यांच्यामध्ये रात्री भांडणे झाली होती. या भांडणाचा राग धरून दुसर्‍या दिवशी सकाळी सलिम शेख यांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलवून घेतले. 

त्यांना तेथे शिरसाठ बंधूंनी मारहाण केली. त्यांचा आरडाओरड ऐकून फिर्यादी गोकुळ गाडे व भुजंगराव गाडे हे मदतीसाठी आले. त्यावेळेस गहिनीनाथ शिरसाठ याने भुजंगराव गाडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीमुळे ते चक्कर येऊन खाली पडले. त्यांचा पुतण्या गोकुळ गाडे यांनी त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मयत घोषित केले. 

यासंदर्भात गोकुळ गाडे यांच्या फिर्यादीवरून गहिनीनाथ शिरसाठ, अशोक शिरसाठ व राजेंद्र शिरसाठ यांच्याविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात भादंवि 304, 323, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सरकारतर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. आरोपींविरुद्ध मारहाण करणे आणि धमकावल्याचा गुन्हा सिद्ध झाला. सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून त्यांची निर्दोष मुक्‍तता करण्यात आली. तिघांनाही मारहाणीबद्दल दोषी धरून 6 महिने शिक्षा व 500 रुपये दंड, जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल एक वर्ष सक्‍तमजुरी, 500 रुपये दंड, दंड न  भरल्यास 15 दिवस साधी कैदेची शिक्षा ठोठावली आहे. अ‍ॅड. पुष्पा कापसे-गायके यांनी सरकारतर्फे काम पाहिले.हवालदार एम. ए. जोशी यांनी पैैैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.