Thu, Jun 20, 2019 21:01होमपेज › Ahamadnagar › आ. अरुण जगताप पोलिसांना शरण

आ. अरुण जगताप पोलिसांना शरण

Published On: Jul 14 2018 12:48AM | Last Updated: Jul 14 2018 12:48AMनगर : प्रतिनिधी

पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणातील आरोपी आ. अरूण जगताप व ओंकार गिरवले हे दोघे तब्बल तीन महिन्यांनंतर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात शरण आले. त्यांच्यावर अटकेची कारवाई करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर लगेचच वकिलांनी अर्ज केल्यानंतर न्या.एस.डी.पाटील यांनी त्यांना प्रत्येकी 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

केडगाव येथे 7 एप्रिल रोजी सायंकाळी दोघा शिवसैनिकांचे हत्याकांड घडले. त्यावेळी आ. संग्राम जगताप यांना चौकशीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले होते. आ. संग्राम जगताप यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून, त्यांना सोडून देण्याची मागणी करत जगताप समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात अक्षरशः धुडगूस घातला होता. यावेळी पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करत आ. संग्राम जगताप यांना पळवून नेण्यात आले होते. कार्यालयाचे दरवाजे लाकडी दांडक्याने तोडून, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले होते.

पोलिस अधीक्षक कार्यालयात अनधिकृत प्रवेश करून, बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. पोलिस नाईक संदीप घोडके यांना मारहाण झाली. घोडके यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आ. शिवाजी कर्डिले, आ. अरुण जगताप, माजी आ. दादाभाऊ कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, सचिन जगताप, स्व. कैलास गिरवले, कुमार वाकळे, निखिल वारे यांच्यासह 250 ते 300 जणांवर भा.दं.वि. कलम 353, 333, 143, 147, 148, 149, 452, 427, 323, 504, सार्वजनिक विद्रुपीकरण कलम 3, 7 सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आ.जगताप व गिरवले यांच्या वतीने अ‍ॅड.महेश तवले व अ‍ॅड.सुरेश लगड यांनी काम पाहिले.