Mon, Jun 24, 2019 21:28होमपेज › Ahamadnagar › आगीला मनपाचा हलगर्जीपणाच कारणीभूत!

आगीला मनपाचा हलगर्जीपणाच कारणीभूत!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा सावेडी उपनगरातील आर्ट स्टुडिओ भीषण आगीत भस्मसात झाला. अनेक दुर्मिळ शिल्प, पुस्तकांसह त्यांना मिळालेली पारितोषिके, अ‍ॅवॉर्ड यात खाक झाले. कधीही भरुन न निघणारे हे नुकसान टळले असते. मात्र, मनपाच्या कुचकामी अग्निशमन यंत्रणेकडे केले जाणारे दुर्लक्ष आणि ठिकठिकाणी कचरा पेटविण्याच्या प्रकारांकडे घनकचरा विभाग करत असलेला कानाडोळा यामुळेच हा अनर्थ घडल्याच्या संतापजनक प्रतिक्रीया घटनास्थळी असलेल्या नागरिकांमधून उमटल्या.

काल (दि.1) दुपारी शिल्पकार कांबळे यांच्या स्टुडिओला लागलेली आग शेजारील मोकळ्या पटांगणात पेटविलेल्या कचर्‍यामुळेच लागल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात येत आहे. प्रशासनाकडूनही तसाच प्राथमिक अंदाज व्यक्‍त होत आहे. दीड वाजण्याच्या सुमारास मोकळ्या पटांगणात अज्ञातांनी पेटविलेल्या कचर्‍याची झळ सुखकर्ता कॉलनीतील एका घराला बसली. काही नागरिकांनी पुढाकार घेत ही आग विझवली. मात्र, कडक ऊन आणि वार्‍याच्या झोतामुळे पटांगणात पडलेल्या कचर्‍याने पुन्हा पेट घेतला. तेथील नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहितीही दिली. मात्र, काही मिनिटांतच या आगीने पटांगणाशेजारी असलेल्या कांबळे यांच्या स्टुडिओला विळखा घातला. आगीने रौद्र रुप धारण केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले. आ. संग्राम जगताप, नगरसेवक संपत बारस्कर, निखिल वारे यांनी घटनास्थळी पोहचल्यानंतर एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाला संपर्क साधला. त्यांचे पथक घटनास्थळी पोहचून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु झाले.

आ. जगताप यांनी मनपाच्या अग्निशमन विभागाच्या प्रमुखांना धारेवर धरल्यानंतर पावणे तीन वाजण्याच्या सुमारास मनपाच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी हजेरी लावली. त्यासाठी काही नागरिकांना अग्निशमन विभागाच्या कार्यालयात जावून पुन्हा आगीची माहिती द्यावी लागली. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, नगरसेवक मुदस्सर शेख यांच्यासह शिवसेना उपनेते अनिल राठोड, संभाजी कदम, दिलीप सातपुते यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर मनपाचे फायर फायटर शंकर मिसाळ हे घटनास्थळी हजर झाले. नागरिकांनी दीड वाजता घटनेची माहिती दिल्यानंतर तात्काळ अग्निशमन विभागाचे पथक आले असते, पटांगणातील पेटलेला कचरा जागेवरच विझला असता व पुढील अनर्थही टळला असता, अशी खंत उपस्थितांनी व्यक्‍त केली.

दुसरीकडे शहरात ठिकठिकाणी कचरा पेटविण्याचे प्रकार नवीन नसले तरी याची महापालिकेच्या घनकचरा विभाग कुठलीही दखल घेत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. आग लागलेल्या मोकळ्या पटांगणात दररोज कचरा आणून टाकला जातो. अनेकवेळा तो पेटविलाही जातो. मनपाने या प्रकारांना आळा घातला असता कालची घटनाही कदाचित टळली असती. याकडे महापालिकेचे होणारे दुर्लक्ष आणि कुचकामी अग्निशमन यंत्रणा याबाबत नागरिकांनी तीव्र शब्दांत महापालिकेच्या कारभाराचा पंचनामा केला.


  •