Tue, Sep 17, 2019 21:59होमपेज › Ahamadnagar › बेलवंडी येथे सशस्त्र दरोडा

बेलवंडी येथे सशस्त्र दरोडा

Published On: Dec 07 2017 1:34AM | Last Updated: Dec 07 2017 12:52AM

बुकमार्क करा

श्रीगोंदा : प्रतिनिधी 

तालुक्यातील बेलवंडी येथे चार ते पाच दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकत सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबविली. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहानीत वृद्ध महिला गंभीर जखमी झाली, असून तिच्यावर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

इंदूबाई लहानू शिंदे (वय 62, रा. शिंदेवाडी, बेलवंडी) असे दरोडेखोरांच्य हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बेलवंडीतील शिंदेवाडी येथे इंदूबाई शिंदे या एकट्याच वास्तव्यास आहेत. नेहमीप्रमाणे जेवन करून मंगळवारी (दि.5) रात्री त्या झोपी गेल्या. बुधवारी पहाटेे दोनच्या दरम्यान दरोडेखोरानी घराची खिडकी कटावनीच्या साहाय्याने उचकटून आत प्रवेश केला. ते घरात उचकापाचक करत असताना इंदूबाई जाग्या झाल्या. दरोडेखोरानी त्यांच्या डोक्यावर चार ते पाच ठिकाणी टोकदार शस्राने वार करीत त्यांना जखमी केले. त्याचबरोबर त्यांच्या कानातील सोन्याच्या राजकड्या, नाकातील मुरणी, मणीमंगळसूत्र, असा सुमारे 31 हजार चारशे रूपयांचा मुद्देमाल लुटून नेला. 

इंदूबाई शिंदे यांच्या डोक्यात वार करण्यात आल्याने त्या मोठ्याने ओरडल्या. त्यांच्या आवाजाने बाजूलाच राहणार्‍या विश्‍वनाथ शिंदे यांनी लागलीच तिकडे धाव घेतली. तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या इंदूबाई शिंदे यांना तात्काळ नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेंद्र पडवळ यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. आजूबाजूला दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोर पसार झाले होते. दरम्यान,  नगर येथील श्‍वान पथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. श्‍वानाने घटनास्थळापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत माग दाखविला. दरोडेखोर तेथून वाहनातून पसार झाले असावेत. 

पोलिस उपाधीक्षक सुदर्शन मुंढे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. संदीप शिंदे यांच्या फिर्यादीवरुन जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश हिवरकर करत आहेत.