Sun, Mar 24, 2019 12:27होमपेज › Ahamadnagar › मुळा धरणावर बंदूकधारी पोलिस तैनात 

मुळा धरणावर बंदूकधारी पोलिस तैनात 

Published On: May 14 2018 1:42AM | Last Updated: May 14 2018 12:19AMराहुरी : प्रतिनिधी 

मुळा धरणातील विषारी मासेमारीचा मुद्दा ‘पुढारी’ने हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घेत महसूल, पोलिस व पाटबंधारे विभागाला जागे केले. त्यामुळे धरणावर पोलिस, पाटबंधारे विभागासह ठेकेदार कंपनीच्या कर्मचार्‍यांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, आता बंदूकधारी पोलिसांमुळे अवैध मच्छिमारीसह विषप्रयोगालाही आळा बसणार आहे. मुळा धरणात विषारी औषधासह जिलेटिनचा स्फोट केला जात असल्याची माहिती ‘पुढारी’ने 30 एप्रिल रोजी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत ही चर्चा गेली. मुख्यमंत्री कार्यालयातून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग यांना विषारी मासेमारीबाबत प्रतिबंध घालण्याचा आदेश देण्यात आला होता.

नुकतेच मत्स्य विकास मंडळाचे आयुक्त राजेंद्र भादुले यांना मुळा धरणस्थळी पाठवून घटनेचा अहवाल सादर करण्यास सांगितला होता. दरम्यान, पाटबंधारे अधिकार्‍यांनी प्रारंभी जिलेटिनचा स्फोट अथवा विषारी औषधाने मासेमारी होतच नसल्याचे सांगितले होते. मात्र, मुंबई येथील ठेकेदार कंपनीच्या कर्मचार्‍यांनी 5 जणांना मुळा धरणावर विषारी औषधाने मासेमारी करताना रंगेहाथ पकडले होते. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशान्वये पो. नि. प्रमोद वाघ यांनी बंदूकधारी पोलिसांचा फौजफाटा  मुळा धरणाच्या तटावर तैनात केला आहे. पोलिसांना सहकार्याची भूमिका घेत ठेकेदार कंपनीने सुरक्षारक्षकाची नेमणूक केली आहे. तसेच पाटबंधारे विभागाच्या कर्मचार्‍यांनाही धरणाच्या तटावर संरक्षण देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

याप्रमाणे पोलिस, पाटबंधारे विभागासह ठेकेदार कंपनीचे मिळून 44 जणांचा फौजफाटा मुळा धरणाची निगराणी करणार आहे. बंदूकधारी पोलिस नेमण्यात आल्याने अवैध धंदे करणार्‍यांची मुस्कटदाबी झाली आहे.  पोलिसांच्या बंदोबस्तामुळे मुळा धरणावर सुरक्षितता वाढली असून विषारी औषधाने मासेमारी करणार्‍यांना आळा बसणार आहे. रात्रंदिवस मुळा धरण परिसरात सशस्त्र पोलिस पहारा सुरू झाल्याने अवैधरित्या मच्छिमारी करणा-यांना बंदी घालण्यात आली आहे. ठेकेदाराकडून पाटबंधारे खात्याने सुरक्षा कर्मचार्‍यांचा बायोडाटा मागविला आहे. याशिवाय ओळखपत्र कुणाला दिले याचीही माहिती मागविली आहे.

...तर गय करणार नाही : पो. नि. वाघ

दक्षिण जिल्ह्याची जीवनदायिनी असणार्‍या मुळा धरणाच्या सुरक्षिततेबाबत सतर्कता बाळगण्यात येत आहे. धरणाच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचविणार्‍याला कायदा दाखवून दिला जाईल. विषारी मासेमारी करताना कोणी आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिला आहे.

प्रशासनाला सहकार्य करू : खान

मुळा धरणाच्या पाण्यात रात्रीच्यावेळी अज्ञातांकडून पाण्यात भातामध्ये विष टाकले जात होते. परिणामी, शेकडो प्रमाणात कोळंबी मासे व छोटे मासे मृत होत होते. पाटबंधारे विभाग व पोलिसांना सर्वस्व सहकार्य करीत विषारी औषधाने मासेमारीला लगाम घालण्याचे कार्य यशस्वी करू, अशी ग्वाही ठेकेदार बिलाल खान यांनी दिली.