Tue, Mar 26, 2019 22:15होमपेज › Ahamadnagar › तासिका पूर्ववतसाठी आदेश द्या

तासिका पूर्ववतसाठी आदेश द्या

Published On: Dec 09 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 11:02PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

शासनाच्या आदेशानुसार शारीरिक शिक्षण व कला विषयाच्या तासिका पूर्ववत करण्याबाबत, जिल्ह्यातील शाळांना आदेश देण्यात यावेत, अशी मागणी क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने जि.प. उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रामदास खेडकर यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य क्रीडा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, राज्य खजिनदार घनशाम सानप, माध्यमिक संघटनेचे सचिव आप्पासाहेब शिंदे, कला अध्यापक संघाचे सुनील दानवे, आदी उपस्थित होते.

शानाच्या 5 ऑक्टोबर 2017 च्या परिपत्रकान्वये शारीरिक शिक्षण व कला विषयाच्या कमी झालेल्या तासिका पूर्ववत करण्यात आल्या आहेत. त्याबाबत जिल्ह्यातील सर्व शाळांचे वेळापत्रक बदलण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालया मार्फत आदेश निर्गमित होणे आवश्यक होते. तशा आशयाचे पत्र 3 नोव्हेंबर रोजी देण्यात आले होते. मात्र, या कार्यालयामार्फत आदेश संबंधित विद्यालयांना न मिळाल्याने वेळापत्रकात बदल झालेला नाही.

त्यामुळे एक प्रकारे शासनाच्या आदेशाची ही पायमल्‍ली होत असून, शारीरिक शिक्षण व कला शिक्षकांवर अन्याय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने तातडीने जिल्ह्यातील सर्व शाळांना वेळापत्रकात परिपत्रकाप्रमाणे बदल करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.