Sun, May 26, 2019 08:54होमपेज › Ahamadnagar › सरकारविरोधी शेतकरी आक्रमक

सरकारविरोधी शेतकरी आक्रमक

Published On: Jun 02 2018 2:00AM | Last Updated: Jun 02 2018 12:58AMअकोले : प्रतिनिधी

शेतकरी संपाच्यावेळी शासनाने दिलेले एकही आश्वासन पूर्ण न करता फसवणूक केली. त्याच्या निषेधार्थ आक्रमक होत काल (दि.1) शेतकर्‍यांचे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले होते. किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य सुकाणू समिती  यांच्या वतीने अकोले येथे मोर्चा काढून तहसील कार्यालयाला घेराव घालण्यात आला. तसेच  कार्यालयासमोर दूध ओतून सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला. शहरातील महात्मा फुले चौकातून काढलेल्या विराट मोर्चाने या आंदोलनाला सुरुवात झाली. 

तहसील कार्यालयाजवळ आंदोलक व पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी बंद केलेले  गेट उघडण्यास भाग पाडत शेतकर्‍यांनी आवारात प्रवेश करून  आंदोलन केले. यावेळी शासनाच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.   

किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष कॉ. अशोक ढवळे, सुकाणू समितीचे समन्वयक डॉ.अजित नवले, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सचिव डॉ. संदीप कडलग, अगस्तिचे संचालक महेश नवले, विलास आरोटे,  अ‍ॅड. शांताराम वाळूंज, सदाशिव साबळे, गणेश ताजने, एकनाथ मेंगाळ, खंडू वाकचौरे आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

दुधाला प्रतिलिटर 27 रुपये भाव मिळालाचा पाहिजे, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, शेतकर्‍यांचा सातबारा उतारा कोरा झालाच पाहिजे, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत हा मोर्चा शहराच्या मुख्य रस्त्यावरून अकोले तहसीलवर नेण्यात आला. यावेळी पोलिसांनी तहसील आवाराच्या गेटला कुलूप लावून मोर्चा अडवला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. भर उन्हात आलेल्या या मोर्चाला अशी वागणूक मिळाल्याने शेतकर्‍यांनी हे गेट तोडण्याचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांचा रुद्रावतार पाहून तहसीलदार मुकेश कांबळे, पोलिस उपनिरीक्षक नितीन बेंद्रे यांनी शेतकर्‍यांना गेट न तोडण्याची विनंती केली व स्वतः गेट उघडून दिले. यानंतर तहसील आवारात दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. 

यावेळी अशोक ढवळे म्हणाले, मागील संपाच्या वेळी शासनाने दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबाजवणी करावी.  अन्यथा समविचारी संघटनांना बरोबर घेऊन आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. डॉ. अजित नवले म्हणाले, हे सरकार विश्वासघातकी असून आज सुरू झालेले हे आंदोलन म्हणजे या सरकारला इशारा आहे. सातत्याने शेतकर्‍यांची फसवणूक करून त्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी चालढकल करणार्‍या या सरकारविरुद्ध आता निर्णायक लढा उभारला जाईल. यावेळी तहसीलदार कांबळे यांना निवेदन देण्यात आले. 

पुणतांब्यात घातले सरकारचे वर्षश्राद्ध!

संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करणार्‍या पुणतांबा येथून सुरू झालेल्या आंदोलनाची काल वर्षपूर्ती झाली. मात्र, वर्षानंतरही शेतकर्‍यांच्या कुठल्याही मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्याचा निषेध म्हणून पुणतांबा येथे एका गटाने सरकारचे प्रतिकात्मक वर्षश्राद्ध घालून काळी गुढी उभारली. तर दुसर्‍या गटाने या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांमध्ये एकजूट झाल्याने हा विजय दिवस म्हणून साजरा केला.