Mon, Apr 22, 2019 16:00होमपेज › Ahamadnagar › प्रभागरचना ‘झिकझॅक’च?

प्रभागरचना ‘झिकझॅक’च?

Published On: Jul 30 2018 1:28AM | Last Updated: Jul 30 2018 12:48AMनगर : मयूर मेहता

महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर प्रशासनाकडून तयारी सुरु झाली आहे. प्रभाग रचना करतांना 20 ऑगस्ट 2016 रोजी देण्यात आलेले आदेश विचारात घेतले जाणार असल्याने या आदेशानुसार यंदाच्या निवडणुकीसाठीही प्रभाग रचना ‘झिकझॅक’च होण्याचे संकेत आहेत. मनपा अधिनियमातील तरतुदीनुसार सदस्य संख्या निश्‍चित होणार असून, सदस्य संख्येत वाढ होण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि.27) प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मनपाकडून 7 ऑगस्टपर्यंत प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. लोकसंख्या निश्‍चित करतांना नजीकच्या जनगणनेची आकडेवारी ग्राह्य धरण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. त्यानुसार 2011 मध्ये झालेल्या जनगणनेच्या आधारावरच लोकसंख्या गृहीत धरुन सदस्य संख्या निश्‍चित केली जाणार आहे. 2011 मध्ये महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 3 लाख 50 हजार 859 आहे. या आधारावर मनपा अधिनियमातील तरतुदीनुसार 3 लाख लोखसंख्येसाठी 65 सदस्य व त्यापुढील प्रत्येकी 15 हजार लोकसंख्येसाठी 1 सदस्य यानुसार सदस्य संख्या निश्‍चित केली जाते. या सूत्रानुसार महापालिकेची सदस्य संख्या सध्याच्या सदस्य संख्येइतकीच म्हणजे 68 राहण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे सदस्य संख्या कमी होण्याची अथवा वाढण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगण्यात येते. तसेच आयोगाने बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एका प्रभागात 4 सदस्य या प्रमाणे रचना होणार आहे. मनपाची सदस्य संख्या 68 राहिल्यास सर्व 17 प्रभाग 4 सदस्यांचेच होऊ शकतात, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दुसरीकडे प्रभाग रचना करण्यासाठी यापूर्वीचे सर्व आदेश रद्द करुन 20 ऑगस्ट 2016 रोजी देण्यात आलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश आयोगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करतांना दिले आहेत. या आदेशानुसार प्रभाग रचना करतांना उत्तर दिशेकडून सुरुवात करावी लागणार आहे. उत्तर दिशेकडून सुरुवात करुन ईशान्येकडे (उत्तर-पूर्व), त्यानंतर पूर्व दिशेकडे व पूर्वेकडून पश्‍चिमेकडे सरकत प्रभाग रचना करावी. यानुसार दक्षिणकडे सरकत दक्षिणेकडेच शेवट करावा, असे आयोगाचे निर्देश आहेत. या निर्देशांनुसार यंदाच्या निवडणुकीतही मागील निवडणुकीप्रमाणेच ‘झिकझॅक’ पध्दतीने प्रभाग रचना होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. 

दरम्यान, प्रभाग रचनेचा आदेश आल्यापासून महापालिका वर्तुळात संभाव्य प्रभाग रचनेवरुन चर्चांणा उधाण आले आहेत. चार सदस्यांचा एक प्रभाग होणार असल्याने कोणते प्रभाग जोडले जाणार? याबाबत इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता आहे. शहरातील प्रमुख राजकीय पक्षांनीही प्रभाग रचनेच्या कामकाजावर लक्ष केंद्रीत केले आहे.