Tue, Jul 23, 2019 06:19होमपेज › Ahamadnagar › धनगर आरक्षण अहवाल जाहीर करा : पिचड

धनगर आरक्षण अहवाल जाहीर करा : पिचड

Published On: Sep 04 2018 1:16AM | Last Updated: Sep 03 2018 11:29PMअकोले : प्रतिनिधी

भाजपाच्या सरकारने धनगरांचा आदिवासींमध्ये समावेश करण्याच्या मागणीच्या अनुषंगाने टाटा संशोधन संस्थेला याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी सांगितले होते. त्याप्रमाणे टाटाने हा अहवाल दि. 31 ऑगस्ट 2018 रोजी राज्य सरकारला सादर केला असून हा अहवाल भाजप सरकारने जनतेसमोर जाहीरपणे ताबडतोब मांडावा, असे आवाहन माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी केले. 

पिचड यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, धनगर समाजाने आपला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, ही मागणी केली आहे. यानंतर भाजपा सरकारने राजकीय दबावापोटी टाटा संशोधन संस्थेला यादृष्टीने अभ्यास करण्यासाठी सांगितले होते. वास्तविक पाहाता हे काम पुणे येथील आदिवासी संशोधन समितीला देणे गरजेचे गरजेचे होते पण तसे झाले नाही. पुढे भाजपा सरकारने चार वर्षे राजकारण केले. जाणीवपूर्वक हे काम टाटा संशोधन संस्थेला दिले. गरीब व दीन दुबळ्या आदीवासी समाजाला अंधारात ठेऊन त्यांच्या ताटातले काढून खोट्या  आदिवासींच्या पुढे ताट वाढण्याचे सबलांचे हे कृत्य घृणास्पदच नाही तर आदिवासी समाजावर पुढे अनेक वर्ष घोर अन्याय करणारे ठरणार आहे. भाजप सरकारने चार वर्ष या विषयावर जनतेला झुलवत ठेवले हे दुर्दैवी आहे. 

या अहवालात काय आहे? हे पुढे येणे गरजेचे असून तो सरकारने ताबडतोब 24 तासाच्या आत जाहिर करावा. याबाबत आपण राज्याचे आदिवासी विकास मंत्री, सचिव यांच्याशी देखील; या अहवाला बाबत बोललो पण ते ही याबाबत बोलायला तयार नाही. सरकाने हा अहवाल जनतेसमोर मांडावा असेही पिचड यांनी म्हटले आहे.