Fri, Aug 23, 2019 14:39होमपेज › Ahamadnagar › ‘अ‍ॅनिमल वेस्ट’ आणून टाकले मनपाच्या दारात!

‘अ‍ॅनिमल वेस्ट’ आणून टाकले मनपाच्या दारात!

Published On: Aug 24 2018 12:40AM | Last Updated: Aug 23 2018 10:09PMनगर : प्रतिनिधी

शहरात साजरा करण्यात आलेल्या बकरी ईदनिमित्त झालेले अ‍ॅनिमल वेस्ट जाळून टाकण्याचे आदेश प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी दिले होते. मात्र, पालिकेच्या कर्मचार्‍यांनी ते अ‍ॅनिमल वेस्ट बुरूडगाव कचरा डेपोत आणून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या बुरूडगाव ग्रामस्थांनी हे वाहन तसेच महापालिकेत आणून अ‍ॅनिमल वेस्ट प्रवेशद्वाराजवळच टाकल्याने गुरूवारी (दि.23) सायंकाळी एकच गोंधळ उडाला.

अ‍ॅनिमल वेस्ट पालिकेच्या दारात आणून टाकल्याने महापालिका परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती. बुधवारी शहरात ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईदनिमित्त महापालिकेने तात्पुरते कत्तलखाने उभारले होते. या कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणावर मांसाचे तुकडे (अ‍ॅनिमल वेस्ट) साचले होते. हे अ‍ॅनिमल वेस्ट कचरा डेपोत न टाकता जाळून टाकण्याचे आदेश प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिले होते.

मात्र त्यांचा आदेशाला डावलून महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी अ‍ॅनिमल वेस्ट बुरूडगाव येथील कचरा डेपोत टाकण्यासाठी नेले. मात्र, त्याच्या दुर्गंधीमुळे हे अ‍ॅनिमल वेस्ट कचरा डेपोत टाकण्याचा बुरूडगाव ग्रामस्थांनी विरोध केला. चिडलेल्या ग्रामस्थांनी पालिकेच्याच गाडीत हे अ‍ॅनिमल वेस्ट घेऊन येत महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आणून टाकले.दरम्यान, शुक्रवारी (दि. 24) महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण  सोडत काढण्यात येणार असून, त्याची प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. त्यामुळे हे अ‍ॅनिमल वेस्ट साफ करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.