Tue, Apr 23, 2019 07:37होमपेज › Ahamadnagar › अन् सायंकाळी मिळाले विवाह केल्याचे पत्र!

अन् सायंकाळी मिळाले विवाह केल्याचे पत्र!

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 09 2018 10:13PMश्रीगोंदा : प्रतिनिधी

सैराटचं वारं अजूनही तालुक्यात ओसरायला तयार नाही. त्याचा प्रत्यय काल (दि.9) आला. शनिवारी (दि. 7) एक मुलगी घरातून बेपत्ता झाली. शोध घेतल्यानंतर नातेवाईकांनी मुलगी हरवल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. मात्र नातेवाईक पोलिस ठाण्यातून बाहेर पडताच श्रीगोंदा पोलिसांच्या हातात एक पत्र पडते. त्या पत्रातील मजकूर आणि सोबत जोडलेल्या छायाचित्राने मिसिंग प्रकरणाचा उलगडा होतो.

सैराट या मराठी चित्रपटाचा प्रभाव अद्यापही ग्रामीण भागातील तरुण, तरुणांवर असल्याचे जाणवते. अनेक तरुण-तरुणी चित्रपटातील कथानकाप्रमाणे  विवाहबद्ध झाली. पण कुठल्याही गोष्टीचा एक ठराविक वेळेत परिणाम जाणवतो, असे सर्वसाधारणपणे म्हटल जाते. पण सैराटची तरुणाईला इतकी भुरळ पडली आहे की, चित्रपट येऊन तीन वर्षे उलटली तरी तालुक्यातील तरुणाई यातून बाहेर पडायला तयार नाही. श्रीगोंदा आणि बेलवंडी पोलिस ठाण्यांत यस्वरूपाच्या  अनेक तक्रारी दाखल आहेत.

तालुक्यातील एक मुलगी कामानिमित्त बाहेर जाते, असे सांगून घरातून गेली. मात्र बराच वेळ उलटला तरी ती न परतल्याने नातेवाईकांनी तिचा शोध सुरु केला. मात्र तरीही ती सापडली नाही. अधिक काही विचार न करता नातेवाईकांनी श्रीगोंदा पोलिस ठाणे गाठत मुलगी हरविल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी शोध घेण्याच्या दृष्टीने ती वापरत असलेला मोबाइल, तिचे छायाचित्र नातेवाईकांकडून ताब्यात घेतले. आम्ही युद्धपातळीवर मुलीचा शोध घेऊ. तुम्ही काळजी करू नका, असा दिलासा दिला. नातेवाईकही चिंतेतच पोलिस ठाण्यातून बाहेर पडले. इकडे पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यासाठी आवश्यक असणार्‍या गोष्टींची पूर्तता करण्यास सुरुवात केली. मात्र त्याच दरम्यान श्रीगोंदा पोलिसांच्या हातात एक बंद पाकिट पडले. पोलिस कर्मचार्‍याने ते पाकिट उघडून पाहिले असता, जी मुलगी हरवली होती, त्या मुलीनेच पत्र पाठवून पोलिसांना मी कुठेही हरवले नसून, माझ्या इच्छेनुसार मी माझ्या आयुष्याचा साथीदार निवडला आहे.

त्याच्याशी विवाहबद्ध झाले आहे. मी सुरक्षित असून, माझा शोध घेण्यात येऊ नये, असेही तिने पत्रात म्हटले आहे. एवढेच नाही, तर मी प्रेम विवाह केल्याने माझ्या आणि माझ्या पतीच्या जीवितास धोका असून, संरक्षण मिळावे, अशी मागणी या मुलीने पत्रात केली आहे.गुन्हा दाखल होताच गुह्याचा उलगडा झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला. पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव म्हणाले, तरुणी हरवल्याची तक्रार प्राप्त झाली होती. मात्र या तरुणीने विवाह केल्याची लेखी माहिती प्राप्त झाली आहे.