होमपेज › Ahamadnagar › राज्यात अराजकता वाढली : अजिंक्यराणा पाटील

राज्यात अराजकता वाढली : अजिंक्यराणा पाटील

Published On: Sep 06 2018 1:40AM | Last Updated: Sep 05 2018 11:41PMकर्जत : प्रतिनिधी

माता-भगिनींबद्दल अपशब्द वापरणारे आमदार व त्यांचे सरकार यांना सत्तेचा उन्माद चढला आहे. अनेकांनी बलिदान देवून निर्माण झालेल्या या महाराष्ट्रात अराजकता माजली आहे. असे सरकार आता घालवावे लागणार आहे आणि त्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके होते. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, समाजकल्याणचे सभापती उमेश परहर, मधुकर राळेभात, काकासाहेब तपकीर, राजेंद्र गुंड, नितीन धांडे, शहाजीराजे भोसले, अ‍ॅड. सुरेश शिंदे, सरपंच वसंत कांबळे, विजय गोलेकर, महिला तालुकाध्यक्षा रजनी निंबोरे, शहाजी राळेभात, बाळासाहेब सपकाळ, विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष स्वप्नील तनपुरे,सीमा काळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पाटील म्हणाले, शिवरायांच्या महाराष्ट्रात माता-भगिनींचा आदर केला जातो. मात्र भाजप सरकार, मंत्री, आमदार सत्तेने उन्मत्त झाले आहेत. मुलींना उचलून नेण्याचे जाहीर बोलत आहेत. यावरून माता-भगिणी किती सुरक्षीत आहेत, हे लक्षात येते. अशांना राज्यात फिरू देऊ नका. त्यांची आमदारकी रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करू. शेतकर्‍यांना साले म्हणणारे हे सरकार, सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहे. त्यांनी शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, माता-भगिनींना फसविले आहे आणि हेच ‘अच्छे दिन’ दिले आहेत.

फाळके म्हणाले, फसव्या घोषणा करून सत्तेवर आलेल्या या सरकराचे दिवस भरले आहेत. जिल्ह्यात नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादीच लढविणार आहे. आम्ही जिल्ह्यातील 12 विधानसभा व दोन्ही लोकसभा लढविण्याच्या तयारीत आहोत. मी निवडणूक लढविणार नाही. 12 विधानसभा हा माझा मतदारसंघ आहे. 

गुंड म्हणाल्या, महिलांचा अवमान करणारे हे सरकार आहे. कोपर्डीच्या घटनेस पालकमंत्री आणि त्यांचे सरकार जबाबदार आहे. आमदार राम कदम हाच भाजपचा खरा चेहरा आहे.

राळेभात म्हणाले, सगळे एकत्र आल्यास सत्तेची आणि पैशाची मस्ती असणार्‍या पालकमंत्र्यांचा पराभव होईल. कारण जनता पैशावर नाही तर मी माणसावंर प्रेम करते.
यावेळी शहाजी राळेभात, कैलास हजारे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक सुरेश शिंदे यांनी केले. आभार काकासाहेब तापकीर यांनी मानले. संयोजन स्वप्नील तनपुरे, राजू लाळगे आदी युवकांनी केले.

वावर विकून निवडणूक लढवू : गुंड

पक्षाने सहा महिने अगोदर उमेदवार ठरवावा. आम्हाला संधी दिली, तर वावर विकून निवडणूक लढवू आणि पालकमंत्र्यांचा पराभव करू, असे राजेंद्र गुंड म्हणाले.