Sun, Apr 21, 2019 13:59



होमपेज › Ahamadnagar › पथकास वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न

पथकास वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 20 2018 11:05PM



शेवगाव : प्रतिनिधी

वाळू तस्काराकडून प्रभारी तहसीलदार व कर्मचारी यांना वाहनाखाली  चिरडण्याचा प्रयत्न झाला. परंतु, प्रसंगावधनाने ते बालंबाल बचावले. याप्रकरणी दोन जणांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ महसूल व तलाठी संघटनेने आरोपींना अटक होईपर्यंत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शेवगावचे प्रभारी तहसीलदार भानुदास गुंजाळ यांच्यासह तलाठी कमलाकर आरडले, तुकाराम बुळे, बाळासाहेब केदार, कर्मचारी दत्तात्रय पालवे यांचे पथक आपल्या दोन मोटारसायकलींवरून (एमएच16 -एएस3047) व (एमएच16-एझेड7260) काल (दि.20) पहाटे 6 वाजता अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी वडुले येथून शेवगावकडे येत होते.त्यांना शहरातील न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज जिमखाना गेटसमोर समोरून वाळूने भरलेला डंपर भरधाव वेगात येताना दिसला. या वाहनास अडवून, त्यावर कारवाई करण्यासाठी पथकाने मोटारसायकली रस्त्याच्या कडेला उभा केल्या आणि त्यास थांबण्याचा इशारा केला.

परंतु, या डंपरचालकाने प्रभारी तहसीलदार भानुदास गुंजाळ यांच्यासह पथकातील तलाठी कर्मचार्‍यांच्या अंगावर डंपर घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला आणि उभ्या असलेल्या त्यांच्या मोटारसायकलींना जोराची धडक दिली. यात दोन्ही मोटारसायकलचे नुकसान झाले. मात्र, प्रसंगावधान राखून हे कर्मचारी रस्त्याच्या बाजूला पळाल्याने ते बालंबाल बचावलेे.हा डंपर न थांबता भरघाव वेगानेे निघून गेला. त्याचा नंबर पथकाला पाहता आला नसला तरी, तो कुणाचा आहे याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पथकाच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी नागेश गोविंद निकाळजे (रा. इंदिरानगर, शेवगाव) व एक अनोळखी इसर्में अशा दोघारवर जिवे ठार मारण्याचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ व आरोपीला अटक होईपर्यंत महसूल व तलाठी संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले आहे.

दरम्यान, यापूर्वीही अशा घटना तालुक्यात घडलेल्या आहेत. परंतु, पोलिस यंत्रणेकडून  अवैध वाळू व्यवसाय करणार्‍यांना संरक्षण देण्याचाच प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे वाळू तस्करांचा मुजोरपणा वाढलेला आहे. परिणामी अधिकारी, कर्मचार्‍यांना वाहनाखाली चिरडण्यापर्यंत त्यांचे धाडस वाढले आहे. वाळू तस्कारांविरूद्ध मोक्‍का, एमपीडीए अंतर्गत कारवाया होऊनही, असे प्रकार घडतच आहेत. या प्रकाराचा बिमोड करण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई होण्याची गरज आहे.

आरोपींवर कारवाई करू : उपअधीक्षक जवळे

अवैध वाळू व्यवसायाला प्रतिबंध करण्यासाठी आता मुळावर घाव घातल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी एकत्रित पथक तयार करून कारवाई केली जाईल. आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथक नेमण्यात आले आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून, जामीन मिळणार नाही यासाठी प्रयत्न  करू, असे आश्‍वासन पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी महसूल संघटनेला दिले आहे.
    
तस्करांची पोलिस ठाण्यात टेहळणी

प्रभारी तहसीलदार व तलाठ्यांच्या पथकास वाळू तस्कारांकडून वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. असे असलेतरी या घटनेबाबत शुभाशुभ न मानता,  गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असताना वाळूतस्करांची  पोलिस ठाण्याच्या आवारात टेहाळणी चालू होती. एवढेच नाहीतर काही तस्कर पोलिस अधिकार्‍यांच्या दालनात बसलेले होते.