Tue, Jul 23, 2019 06:16होमपेज › Ahamadnagar › सोशल मीडियावर हौशी राजकारण्यांचा धुमाकूळ

सोशल मीडियावर हौशी राजकारण्यांचा धुमाकूळ

Published On: Mar 10 2018 11:52PM | Last Updated: Mar 10 2018 10:43PMखेड : विजय सोनवणे

तुम्ही राजकारणात कोणत्या पदावर जाल?अशी फेसबुक पेजवर प्रोफाईल येते आणि सुरू होतो राजकारण्यांचा धुमाकूळ!  कारण सर्वसामान्य माणूसही पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, महापौर , नगरसेवक, सरपंच सहज होत असल्याने सध्या याची सोशलवर चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

‘मला आमदार झाल्यासारखं वाटतय’ हे लोकगीत सर्वपरिचित आहे, मात्र फेसबुकवर ‘आमदारच’ नव्हे तर अगदी खासदारांपासून राष्ट्रपती होण्यापर्यंत कसलेच बंधन नसल्याने जो तो मंत्री होण्याचा आस्वाद घेत आहे. फेसबुकवर विचारलेल्या ‘तुम्ही कोणत्या पदावर जाल? या प्रश्‍नाच्या उत्सुकतेने अनेकजण या मेजिक प्रोफाईलवर जावून आपली राजकीय कुवत आजमावत आहेत.

त्यात अनेकांना मोठी पदे मिळत असून काहींना सरपंच पदावरच आपली राजकीय भूक भागवावी लागत आहे. आपल्याकडे मुख्यमंत्री पदाची राजकीय कुवत असताना आपण सोशलवर केवळ सरपंच बनलो, या भावनेने अनेकजण फेसबुकच्या प्रोफाइलवर नाराज आहेत. 

गेली आठवडाभरापासून फेसबुकवरील हे राजकारणाचे वारे थांबायला तयार नसल्याने अनेकांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना टार्गेट करत याची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. फेसबुकवर निवडून आलेले सर्व नवनिर्वाचित उमेदवार हे भाजपाचेच! ‘अब की बार मोदी सरकार’, ‘ईव्हीएम मशीन घोटाळा’ अशा अनेक गंमतीदार पोस्ट करून चर्चेला उधाण आणत आहेत. एवढेच नव्हे तर ‘आपल्या अंगी कोणत्या नेत्याचे गुण आहेत? हा प्रश्‍न देखील फेसबुकवर वेगाने फिरत आहे. त्या प्रोफाईलवर देखील शरदचंद्रजी पवार, अजित पवार यांचे गुण आपल्या अंगी असल्याचे निदर्शनास येत असल्याने काहींना हायसे वाटत आहे.आगामी निवडणुकांचा प्रचारच या माध्यमातून सोशलवर केला जात असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे.

सोशलचा ‘सोसल’ तेवढाच वापर होणे गरजेचे! 

सध्या सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला थांबवणे जिकिरीचे झाले आहे. कमी खर्चात जास्त इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्याने सर्व वेळ सोशल मीडियाच्या दुनियेत जात आहे. सोशलचा ‘सोसल’ तेवढाच वापर न झाल्यास तरुणाई बेरोजगारीकडे गेल्याशिवाय राहणार नाही.