Mon, Jun 17, 2019 04:10होमपेज › Ahamadnagar › मळगंगा देवी मंदिरातील चोरीचा २४ तासांत उलगडा

मळगंगा देवी मंदिरातील चोरीचा २४ तासांत उलगडा

Published On: Sep 03 2018 1:38AM | Last Updated: Sep 03 2018 1:03AMनगर : प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा देवी मंदिरातील चोरीचा अवघ्या 24 तासांच्या आत उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. देवीचे सोन्या-चांदीने दागिने, दोनपेटीतील रोख रक्कम चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा व पारनेर पोलिसांच्या संयुक्त पथकाने जेरबंद केली आहे. एक सराफ, 4 चोरटे अशा एकूण 5 जणांना अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

अटक केलेल्यांमध्ये सखाराम नंदू गावडे (19, रा. वडगाव मावळ, जि. पुणे), रमेश ऊर्फ राहुल बाळू पडवळ (22, रा. निमगाव दाभाडे, ता. खेड, जि. पुणे), भास्कर खेमा पथवे (40, रा. नांदूर दुमाला, ता. संगमनेर),  राहुल ऊर्फ भाऊसाहेब निळे (27, रा. मिर्झापूर, ता. संगमनेर) व प्रशांत कृष्णनाथ भुजबंद (रा. कळस, ता. अकोले) यांचा समावेश आहे. यातील भुजबंद याने देवी मंदिरातून चोरी केलेले सोने खरेदी केले होते. अटक केलेल्या टोळीकडून 1 लाख 39 हजार 889 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

निघोज येथील मळगंगा देवी मंदिरातून चोरी करणारे चोरटे पुणे जिल्ह्यातील खेड व संगमनेर तालुक्यातील मिर्झापूर, नांदूर दुमाला परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना समजली. 

त्यावरून पोलिस निरीक्षक पवार व पारनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रोहन खंडागळे, ज्ञानेश्‍वर फडतरे, सचिन खामगड, राजेंद्र पवार, कर्मचारी भाऊसाहेब काळे, दत्ता हिंगडे, मन्सूर सय्यद, विजयकुमार वेठेकर, रवींद्र कर्डिले, भागिनाथ पंचमुख, संदीप पवार, विनोद बोरगे, अभिजित आरकल आदींची दोन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. या पथकांनी रविवारी पहाटेच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील खेड व संगमनेर तालुक्यात सापळा रचून चौघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मळगंगा देवी मंदिरात केलेल्या चोरीची कबुली दिली आहे.

चोरट्यांनी चोरलेली रक्कम आपसांत वाटून घेतली होती, तर सोन्या-चांदीने दागिने अकोले तालुक्यातील कळस येथील सराफ प्रशांत भुजबंद यास विकले होते. पोलिस पथक अकोले तालुक्यातील कळस येथे गेले. तेथून दोन किलो वजनाचे देवीचे चांदीचे मुखवटे, सोन्याचे डोरले, मणी, कर्णफुले, साखळी, नथेची तार असा एकूण 1 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच चोरट्यांनी वाटून घेतलेल्या रकमेतील 34 हजार 889 रुपये हस्तगत केले आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली लोखंडी कैची, दोन लोखंडी पक्कड जप्त केल्या आहेत. या टोळीने संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथील काळभैरवनाथ मंदिरातही अशाच पद्धतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे. अटक केलेल्या टोळीला पुढील चौकशीसाठी पारनेर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.