Sun, May 26, 2019 00:36होमपेज › Ahamadnagar › कौडगावची दारू सिव्हिलमधलीच

कौडगावची दारू सिव्हिलमधलीच

Published On: Dec 13 2017 1:52AM | Last Updated: Dec 12 2017 10:55PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

कौडगाव येथील दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने अटकेत असलेल्या भीमराज आव्हाड, जितू गंभीरसह 8 जणांच्या पोलिस कोठडीत  शुक्रवारपर्यंत (दि. 15) वाढ करण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्यात अटक केलेल्या आणखी दोघांनाही 15 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. कौडगाव येथील लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली दारू ही जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमधूनच खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.

या गुन्ह्यात नव्याने अटक केलेल्या दोघांमध्ये राजेंद्र शंकर गाढवे (रा. कौडगाव, ता. नगर), महादेव जगन्नाथ कापसे (रा. माथणी, ता. नगर) यांचा समावेश आहे. यापूर्वी भीमराज गेणू आव्हाड (रा. पांगरमल, ता. नगर), जितू ऊर्फ जगजितसिंग किसनसिंग गंभीर, जाकीर कादर शेख, हमीद अली शेख, सोनू ऊर्फ संदीप मोहन दुग्गल, अजित ऊर्फ नन्ना सेवाणी (सर्व रा. तारकपूर), याकुब युनूस शेख (रा. शिवाजीनगर, कल्याण रस्ता, नगर), भरत रमेश जोशी (रा. सिव्हिल हडको, नगर) यांना गुन्ह्यात वर्ग केले आहे. 

पोलिस कोठडीत असताना 8 आरोपींकडे केलेल्या चौकशीत कौडगाव येथे दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दारुचे सिव्हिलचे कनेक्शन उघड झाले आहे. तसेच त्यात आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली. त्यामुळे  त्या दोघांनाही नगर तालुका पोलिसांनी मंगळवारी अटक केली. पूर्वीचे 8 व नवीन 2 अशा 10 आरोपींना काल (दि. 12) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 15 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

नगर तालुक्यातील सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात संशयावरून 8 जणांना शनिवारी वर्ग करण्यात आले होते. जिल्हा परिषद निवडणुकीवेळी कौडगाव येथे विषारी दारुने दोघांचा मृत्यू झाला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नेरकर हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत. 

नाशिक येथील कारागृहात ‘मोक्का’ अन्वये अटक असलेल्या आणखी एका आरोपीचे या गुन्ह्यात नाव उघड झाले आहे. त्यालाही लवकरच कौडगाव येथील सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात वर्ग केले जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.