Sun, Apr 21, 2019 01:52होमपेज › Ahamadnagar › दांडीबहाद्दर अधिकार्‍यांना नोटिसा

दांडीबहाद्दर अधिकार्‍यांना नोटिसा

Published On: Dec 31 2017 1:30AM | Last Updated: Dec 30 2017 11:15PM

बुकमार्क करा
अकोले : प्रतिनिधी

तहसीलदारांच्या दालनात झालेल्या ग्राहकदिनी अकोले तालुक्यातील अनेकांनी ग्राहक हक्क म्हणून भेडसावणार्‍या समस्या लेखी व तोंडी स्वरूपात तहसीलदार मुकेश कांबळे यांच्यासमोर मांडल्या. त्यात गॅसविषयक तक्रारी जास्त होत्या. जे अधिकारी ग्राहक दिनास गैरहजर होते, त्यांना कारणे दाखवा नोिेटसा काढण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले. तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्राहकदिनाच्या बैठकीत नायब तहसीलदार भाऊराव भांगरे, डी.एन. काकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विष्णू कळंबे, भूमी अभिलेखचे एस.पी.सावंत, जि.प. बांधकामचे भगवान कोल्हारे, नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण निकम, वजनमापे निरीक्षक राकेश रावते, पुरवठा निरीक्षक संजय भिंगारदिवे, पुरवठा अव्वल कारकून संतोष बगाड, धनश्री वाडगे आदी अधिकारी उपस्थित होते. 

बैठकीत गॅसधारकाला वेळेवर गॅस मिळत नाही, रास्त भावात व घरपोहोच टाकी मिळत नाही. त्याच बरोबर ग्राहकाला पैसे दिल्याची पावती मिळत नाहीत, अशा अनेक तक्रारी मांडतानाच डीजेचा आवाज आणि त्याचे होणारे दुष्परिणाम याबद्दल ग्राहकांनी जोरदार आवाज उठविला. बसस्थानकातील अस्वच्छता, तेथे सुरू असणारे अवैध व्यवसाय, राजूरमधील अवैध दारूविक्री, अकोले तालुक्यातील अवैध गुटखा विक्री, महावितरणचा गलथान कारभार, नगरपंचायतीचे स्वच्छता अभियान व अग्निशामक गाडी, भूमी अभिलेखचा रटाळ कारभार, आधार नोंदणी केंद्र वाढविण्याबाबत ग्राहकांचा आग्रह, तसेच तालुक्यातील 1 ते 20 पटसंख्या असलेल्या 19 शाळा बंद करू नये, आश्रम शाळेतील मुलांना चांगले भोजन दिले जात नसल्याच्याही तक्रारी अनेकांनी मांडल्या. 

बांधकाम खात्याने केवळ खड्डे न बुजविता रस्त्यांची पक्की कामे करावीत, जनधन योजनेद्वारे बँकांकडून होत असलेली खातेदारांची पिळवणूक, तालुक्यातील केबल टी. व्ही. चालक योग्य सेवा देत नाही, सरकारी कार्यालयांत शासन निर्णयानुसार महापुरुषांचे फोटो लावावेत, वजन काटे नोंदणी, पडताळणी व दुरुस्तीची योग्य शुल्क वजन मापे निरीक्षक कार्यालयाने घ्यावी, सात-बारा वरील पीक पाहणीची नोंद, प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालयात असणार्‍या अपुर्‍या सुविधा व यांत्रिक सुविधा, सर्वच मोबाईल कंपन्यांबाबत नेटच्या रेंजबाबत अनेकांच्या तक्रारी, तालुक्यातील काही पतसंस्था मोडकळीस मिघाल्या आहेत. अनेक ग्राहकांच्या ठेवी त्यात अडकलेल्या आहेत.

याबाबत सरकारने त्वरित कारवाई करून ठेवीदारांना त्यांची रक्कम परत करण्यासाठी सहकार्य करावे, अशा अनेक गंभीर समस्या यावेळी ग्राहकांनी मांडल्या. यावेळी ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, डॉ.किरण लहामटे, अ‍ॅड. भाऊसाहेब वाळुंज, रमेश राक्षे, नरेंद्र देशमुख, राम रुद्रे, प्रा. डॉ.सुनील शिंदे, संजय वाकचौरे, माधवराव तिटमे, राजेंद्र गायवट, अ‍ॅड. दीपक शेटे, नगरसेवक प्रमोद मंडलिक, सुदाम मंडलिक, मंगलताई मालुंजकर आदी उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीस काही विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याने त्यांना रितसर नोटिसा बजावणार असल्याचे तहसीलदारांनी नागरिकांशी चर्चा करताना यावेळी सांगितले.