होमपेज › Ahamadnagar › सरकार किती ठिकाणी जाळ्या लावणार?

सरकार किती ठिकाणी जाळ्या लावणार?

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 16 2018 12:47AMनगर : प्रतिनिधी

राज्य सरकार शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करु शकले नाही. चुकीच्या धोरणांमुळे शेतकर्‍यांबरोबरच सर्वसामान्य जनताही पोळून निघाली आहे. सरकार किती ठिकाणी जाळ्या लावणार? असा सवाल करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. देशातील सध्याची परिस्थिती व नेत्यांच्या वक्‍तव्यांचा गंभीर परिणाम होत असून, देशात मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा घाणाघातही त्यांनी केला आहे.

हल्लाबोल आंदोलनासाठी आले असता नगर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले की, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पोलिस निरीक्षकच गुन्ह्याचे कट रचत असल्याचे नगरमध्ये पुढे आले आहे. उद्योगांत मंदीचे वातावरण आहे. रोजगार उपलब्ध करुन देण्याऐवजी भजी तळण्याचे सल्ले दिले जात आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. दुसरीकडे केंद्रातही विदारक स्थिती आहे.

हजारो कोटींचे घोटाळे उघडकीस येत आहेत. बडे उद्योजक बँकांना लुबाडून देशाबाहेर पळत आहेत. कायम नफ्यात असणारी स्टेट बँकही तोट्यात गेली आहे. गेल्या काही दिवसांत 40 जवान शहीद झाले आहेत. चीनमुळे देशात निर्माण झालेली परिस्थिती 10 वर्षे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना कधी उद्भवली नाही. शत्रूला आपला दराराच वाटत नाही. ही देशासाठी चिंतेची बाब आहे, असे ते म्हणाले. या सर्व घटना विचार करायला लावणार्‍या असून, देशात मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीका पवार यांनी केली.

प्रकाश आंबेडकरांनी आत्मपरीक्षण करावे!

सध्या कुणीही उठून शरद पवार यांच्यावर आरोप करीत आहेत. त्यांनी आधी त्यांचे कार्य काय आहे? आजवरच्या राजकीय कारकिर्दीत आपण काय केले? सध्या आपली परिस्थिती काय आहे? याचे आत्मपरीक्षण करावे, असा खोचक सल्ला अजित पवार यांनी खा. प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे.