Wed, Nov 14, 2018 16:38होमपेज › Ahamadnagar › ‘कर्जत-जामखेड’चे नागरिक बोलावित आहेत

‘कर्जत-जामखेड’चे नागरिक बोलावित आहेत

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 22 2018 11:13PMकर्जत : प्रतिनिधी

मला कर्जत व जामखेडचे नागरिक बोलवत आहेत, असे उद‍्गार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे पालिकेच्या एका कार्यक्रमात बोलताना काढले. त्यामुळे पवार या मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. 

बारामती नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नुकताच एक कार्यक्रम झाला. या वेळी बोलताना पवार  म्हणाले, बारामतीच्या जनतेने मला फार प्रेम दिले आहे. ते मी कधीच विसरू शकणार नाही. नागरिकांची कामे ही झाली पाहिजेत. बारामती पालिकेच्या सर्व नगरसेवकांनी नागरिकांच्या प्रभागातील कामे करण्यावर भर द्यावावा, असे मला वाटते. तुम्ही चांगले काम करा. मला कर्जत-जामखेडचे नागरिक बोलावत आहेत. त्यांचेही  माझ्यावर  फार प्रेम आहे. मला त्यांचा विचार करावा लागेल, असे सांगून एक प्रकारे संकेतच पवार यांनी यावेळी दिला आहे.

कर्जत जामखेड मतदारसंघामधून पवार हे निवडणूक लढविणार असल्याचे संकेत त्यांनी राशीन येथील सरंपच श्याम कानगुडे यांनी आयोजीत कुस्त्यांच्या वेळी उपस्थित शेकडो नागरिकांसमोर सांगितले होते. त्यानंतर कर्जत येथे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांनी शेतकरी मेळाव्यासाठी वेळ मागितला होता. त्यास पवार यांनी तयारी दाखवत लगेच तारीखही दिली. मात्र स्थानिक नेत्यांना कार्यक्रमाचे नियोजन करण्यात अपयश आल्याने मेळावा रद्द झाला होता. मात्र आजही कर्जत-जामखेड मतदारसंघातील नागरिकांमध्ये पवार येथून उभे राहणार काय, या विषयी कमालीची उत्सुकता आहे.

पवार यांनी बारामती येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये पुन्हा कर्जत-जामखेडचा उल्लेख केला व एका वृत्तवाहिनेही ही बातमी प्रसिद्ध केल्यापासून दोन्ही तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा पवार येथे उभा राहणार काय, याबाबत जोदरार चर्चा सुरू झाली आहे.  अंबालिका साखर कारखान्यामुळे ते कर्जत तालुक्यात सतत येत असतात, ही पण जमेची बाजू असल्याचे अनेक जण सांगतात.