Mon, Apr 22, 2019 02:24होमपेज › Ahamadnagar › पदाधिकारी हत्‍या प्रकरण, ‘तर शिवसैनिकांचा संयम सुटेल’

पदाधिकारी हत्‍या प्रकरण, ‘तर शिवसैनिकांचा संयम सुटेल’

Published On: Apr 10 2018 4:41PM | Last Updated: Apr 10 2018 6:26PMअहमदनगर : प्रतिनिधी

किरकोळ घटना घडूनही शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन दिवसांनंतर गुन्हे कसे दाखल झाले? एसपी ऑफीस फोडल्याप्रकरणी गंभीर गुन्हा असतानाही कलम वगळले कसे? पोलिस कुणाच्या दबावाखाली आहेत? असा सवाल करून शिवसेनेवर दबावतंत्र सुरू असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. शिवसेना अन्याय सहन करणार नाही. खोटे गुन्हे दाखल केल्यास संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना उभी राहील. गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ १५ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा काढण्यात येणार आहे. तोपर्यंत गुन्हे मागे न घेतल्यास शिवसैनिकांचा संयम सुटेल, असा इशारा जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे व घनश्याम शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिला.

उपनेते अनिल राठोड म्हणाले, ‘‘कलमे वगळल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आले आहे. एसपींनाही जाब विचारण्यात आला आहे. पोलिस मोठ्या लोकांना आणि त्यांच्या दुकाने, हॉटेलला संरक्षण देत आहेत. एसपींकडे मागणी करूनही मयतांच्या कुटुंबीयांना अद्याप पोलिस संरक्षण देण्यात आलेले नाही. शिवसेनेने वरीष्ठ पातळीवर याची गंभीर दखल घेतली आहे. शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे नगरला येणार आहेत, असे अनिल राठोड यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेना पदाधिकाऱ्यांना लवकर जामीन मिळू नये यासाठी पोलिसांनी आकसापोटी गंभीर कलम लावले. तर एसपी ऑफीस फोडणाऱ्यांना लवकर जामीन व्हावा यासाठी ३३३ चे कलम हटवण्यात आले. यामागे कुणाचा दबाव आहे? असा सवालही राठोड यांनी केला आहे.

Tags : Ahmednagar, shivsena, press conference, double murder of Shiv Sena leaders