होमपेज › Ahamadnagar › जिल्हा बँकेच्या मनमानीला बसणार चाप!

जिल्हा बँकेच्या मनमानीला बसणार चाप!

Published On: Jun 17 2018 1:34AM | Last Updated: Jun 16 2018 11:31PMनगर : प्रतिनिधी

नगर जिल्हा बँकेसह राज्यातील अनेक जिल्हा बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्यानंतर राज्य शासनाने जिल्हा बँकांच्या मनमानीला चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा बँकांची संपूर्ण भरती प्रक्रिया, परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून, यावर सहकार आयुक्त व विभागीय सहनिबंधकांचे सनियंत्रण राहणार आहे. उच्च न्यायालयाने जिल्हा बँकेची भरती रद्द केल्यास या नवीन पद्धतीनेच भरती प्रक्रिया होणार आहे.

नगरच्या जिल्हा बँकेने प्रथम व द्वितीय श्रेणी अधिकारी, ज्युनिअर ऑफिसर, लिपीक अशा 465 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. प्रक्रियेबाबत विविध तक्रारी प्राप्त झाल्याने विभागीय सहनिबंधकांनी चौकशी समिती नेमली होती. या समितीने 12 फेब्रुवारी रोजी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था या कार्यालयास शिफारशींसह अहवाल सादर केला होता. चौकशी अहवाल व चौकशी निष्कर्षानुसार भरती प्रक्रिया सदोष व गैरहेतूने प्रेरित असल्याचे स्पष्ट झाले. या आधारे नाशिकचे सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी भरती प्रक्रिया रद्द करण्याचा आदेश काढला होता. यावर उच्च न्यायालयात निर्णय प्रलंबित आहे.

अशाच प्रकारे राज्यातील अन्य जिल्हा बँकांमधील भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरली होती. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा व परिक्षोत्तर टप्प्यात काही बँकांच्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या. प्राथमिक चौकशीत भरतीची प्रक्रिया प्रामाणिक, निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने झाली नसल्याचे दिसून आले. या सदोष भरती प्रक्रियेने बँकांच्या प्रशासनावर अनिष्ट परिणाम होऊन बँकेवर विश्वास ठेवत गुंतवणूक करणार्‍या ठेवीदार जनतेच्या हितास बाधा पोहोचण्याची शक्यता होती. याबाबत नाबार्डने दिलेल्या अहवालात जिल्हा बँकांमध्ये गुणवत्तापूर्ण सेवक वर्ग भरती होण्याची गरज असल्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने निर्णय घेतला आहे.

नगर जिल्हा बँकेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात आले. मात्र परीक्षा ऑफलाईन पद्धतीने झाली होती. परीक्षा झाल्यावर उत्तरपत्रिका व गुणतक्ता यामध्ये गैरप्रकार झाल्याच्या अनेक तक्रारी होत्या. नव्या आदेशाने भरती झाल्यास परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घ्यावी लागणार आहे. नगर जिल्हा बँकेची भरती प्रक्रिया  राबवितांना नियुक्त केलेल्या नायबर या संस्थेवर विविध आरोप झाले होते. या संस्थेने दुसर्‍या जिल्ह्यात घेतलेल्या भरतीतही घोळ झाल्याचा आरोप होता. नवीन आदेशानुसार आता गलथान व्यवस्थापन, भ्रष्टाचार, गुन्हेगारी हस्तक्षेप असे आरोप असलेल्या संस्थेची निवड करता येणार नाही.ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर दहा दिवसात उत्तरतालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी लागणार आहे.