Thu, Jun 27, 2019 16:04होमपेज › Ahamadnagar › मराठा आरक्षण : रास्ता रोको, किरकोळ दगडफेक, धरणे

मराठा आरक्षण : रास्ता रोको, किरकोळ दगडफेक, धरणे

Published On: Jul 26 2018 1:30AM | Last Updated: Jul 25 2018 10:20PMनगर : प्रतिनिधी

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदला काल (दि. 25) नगर शहरात उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. शहरातून जाणार्‍या 10 महामार्गांवर व जिल्ह्यात एकूण 20 ठिकाणी सकल मराठा समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, शहरातील इंपिरिअल चौक, मनमाड रस्त्यावरील शोरुम, लक्ष्मी कारंजा, टिळक रस्ता, रेल्वे स्टेशन परिसरात किरकोळ दगडफेक झाली. 

दुपारनंतर शहरातून जाणारे सर्व रस्ते खुले झाले व वाहतूक सुरळीत वाहतूक सुरू झाली. 4 जणांचा ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले. कर्जतमध्ये वनविभागाची गाडी जाळण्याची घटना वगळता जिल्ह्यात इतरत्र जाळपोळीची घटना घडली नाही. 3 ठिकाणी शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील 45 गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. नगर शहरातील बंदमध्ये शाळा, महाविद्यालयांनीही सहभाग घेतला होता. काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू होत्या. त्यांना स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेने बंदमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्या आवाहनाला शाळा व्यवस्थापनांनी प्रतिसाद दिला.

नगर शहरातून पुणे, कल्याण, औरंगाबाद, मनमाड, जामखेड, सोलापूर, पाथर्डी, दौंड आदी ठिकाणी जाणार्‍या रस्त्यांवर 10 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महापौर सुरेखा कदम, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. राष्ट्रवादी व काँग्रेसचेही कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र, या पक्षांचे मोठे नेते आंदोलनात नव्हते. शिवप्रहारचे अध्यक्ष संजीव भोर यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही सहभागी झाले होते.

स्मायलिंग अस्मिता विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी सकाळी 7 वाजल्यापासून शहर व परिसरातील शाळा, महाविद्यालयांत जाऊन बंदमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले. यात संघटनेचे समन्वयक यशवंत तोडमल, शुभम पांडुळे, अजित कोतकर, अविनाश लाकुडझोडे, राकेश साठे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.  

कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्यांच्याकडून सतत आढावा घेतला जात होता. नगर शहर परिसरात श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस उपअधीक्षक (गृह) अरुण जगताप यांच्यासह 5 पोलिस निरीक्षक, 5 सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस मुख्यालयातील 200 कर्मचारी, शहरातील कोतवाली, तोफखाना, कँप, एमआयडीसी व नगर तालुका या पाच पोलिस ठाण्यांचे 175 कर्मचारी व अधिकारी, शहर वाहतूक शाखेचे 45 कर्मचारी, राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी, स्ट्रायकिंग फोर्स, पोलिस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखांतील 50 कर्मचारी, 50 होमगार्ड असा सुमारे 500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बंदमध्ये सहभाग न घेतलेल्या काही दुकाने, शोरुमवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. इंपिरिअल चौकातील हॉटेल, टिळक रस्त्यावरील सॉ-मिल, मनमाड रस्त्यावरील शोरुम, लक्ष्मी कारंजा येथील पानटपरी, बुरुडगाव रस्त्यावरील दुकान, रेल्वे स्टेशन परिसरात किरकोळ दगडफेक झाली. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू शकला नाही. एसटी बसेसचे नुकसान होऊ नये, यासाठी बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. सायंकाळपर्यंत तारकपूर आगारातून एकही बस बाहेर सोडण्यात आलेली नव्हती.