होमपेज › Ahamadnagar › नगर : ठाकरेंच्या सभेनंतर गोंधळ; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

नगर : ठाकरेंच्या सभेनंतर गोंधळ; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Published On: Feb 27 2018 3:56PM | Last Updated: Feb 27 2018 4:26PMनगर : प्रतिनिधी

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची अफवा पसरली होती. त्यांच्या पारनेर येथील सभेनंतर शिवसेनेच्या दोन गटांतील वाद उफाळून आला. या गडबडीत आमदार विजय औटी यांच्या गाडीचे चाक पायावरून गेल्याने शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड जखमी झाले आहेत.

औटी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे यांच्या उपस्थितीत हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, तालुक्यातील शिवसेना तालुकाप्रमुख नीलेश लंके आणि औटी यांच्या गटांत वाद आहेत. सुरुवातीला लंके यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी मेळाव्यात येऊन शक्तिप्रदर्शन केले. 

भाषणात औटी यांनी लंके यांचा नामोल्लेख टाळला. त्याचा राग लंके समर्थकांनी घोषणाबाजी करून व्यक्त केला. सभा संपून ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा निघाला तेव्हाही घोषणाबाजी सुरूच होती. ताफ्याच्य पाठोपाठ औटीही आपल्या गाडीतून निघाले. काही कार्यकर्ते त्यांच्या गाडीच्या मागे धावले. त्यामुळे औटी यांच्या चालकाने गाडी वेगाने पुढे घेतली. तेथे उपस्थित असलेले उपनेते राठोड यांच्या पायावरून गाडीचे चाक गेल्याने ते जखमी झाले. याचा राग आल्यावर कार्यकर्त्यांनी औटी यांच्या गाडीची काच फोडली. कार्ले आणि राठोड यांच्यावर उपचार सुरू आहेत.