होमपेज › Ahamadnagar › पंतप्रधानांचे पत्र हरवले अन् नागरिक बेघर

पंतप्रधानांचे पत्र हरवले अन् नागरिक बेघर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

'आईचे पत्र हरवले'  असे म्हटल्यास तुम्हाला कदाचित बालपण आठवेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पत्र हरवले, ही तुम्हाला गंमतच वाटेल. पण अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे असा पंतप्रधान कार्यालयातून आलेले पत्र हरवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर प्रशासनाने  बेघर करण्याचा खेळ मांडल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्यातून उमटत आहे.

पारनेर तालुक्यातील निघोज येथील शासकीय जागेवरील अतिक्रमण काढून टाकण्याची प्रक्रिया चालू असताना, ही घरे वाचवण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेले पत्र त्याच वेळी गहाळ झाल्याचा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात घडला आहे. माहितीच्या अधिकारात हा प्रकार उघड झाला आहे. निघोजची घरे पाडण्यात पंतप्रधान कार्यालयाचा अडथळा नको असल्यानेच हे पत्र गहाळ केल्याचा आरोप करीत, त्यास कारणीभूत असणार्‍यांना निलंबित करावे, अशी मागणी राजेंद्र निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

निघोजच्या अतिक्रमणांबाबत दाखल झालेल्या एका जनहित याचिकेत उच्च न्यायालयाने ही अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश दिले होते. तर दुसर्‍या बाजूला हे आदेश येण्यापूर्वी निंबाळकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत उच्च न्यायालयाचे शासकीय जागेवर राहत असलेल्या कुटुंबाना मालकी हक्काचे उतारे देण्याचे आदेश दिले होते. प्रशासकीय यंत्रणेने मात्र निघोज येथील अतिक्रमणांबाबतच्या याचिकेत प्रतिज्ञापत्र दाखल करताना अतिक्रमण नियमित करण्याचे आदेश व केंद्र शासनाचे प्रधानमंत्री आवास योजनेत घरासाठी जागा देण्याचे धोरण लपवून ठेवल्याने न्यायालयाने निघोजमधील अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश दिले .

ही घरे वाचवण्यासाठी निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 16 जुलै 2017 रोजी तक्रार केली होती. ही बाब उच्च  न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन गोरगरिबांची घरे वाचवावी, अशी विनंती या पत्रात करण्यात आली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत पंतप्रधान कार्यालयाच्या निर्देशाने  महसूल मंत्रालयाने 24 ऑगस्ट रोजी शेरा क्र 1566 नुसार जिल्हाधिकारी यांना याबाबत तात्काळ माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. या पत्राची रितसर नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टपाल शाखेत होऊन, हे पत्र पुढील कार्यवाहीसाठी महसूल विभागाकडे पाठविण्यात आले. परंतु, हे पत्र त्याच वेळी गहाळ झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. हे पत्र गोरगरिबांची घरे वाचविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते.

Tags : Prime Ministers, Prime Ministers Office, Save People House, Nighoj, Ahmadnagar,  Collector Office, Important Letter


  •