Sun, May 26, 2019 09:04होमपेज › Ahamadnagar › अगोदर अहिल्यादेवींच्या विचारांचे रक्षण करा

अगोदर अहिल्यादेवींच्या विचारांचे रक्षण करा

Published On: Jun 01 2018 1:44AM | Last Updated: May 31 2018 11:40PMजामखेड :  प्रतिनिधी

 अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गोंधळ घालून व पत्रके भिरकावून धनगर आरक्षण मिळत नसते. यासाठी हा मुद्दा योग्य मार्गाने लोकसभेत व राज्यसभेत मांडला जाणार आहे. दोन तृतीयांश बहुमताने हा निर्णय घेतला जाणार आहे. आरक्षण मागता तर अगोदर अहिल्यादेवींच्या विचारांचे रक्षण करा, असा सल्ला लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी देऊन आरक्षणाच्या निर्णयाला बगल दिली

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 293 वा जयंती महोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन बोलत होत्या.  स्वागत अध्यक्ष पालकमंत्री राम शिंदे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आ. शिवाजी कर्डिले, आ. भिमराव धोंडे, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. नारायण पाटील,आ. दत्तात्रेय भरणे,आ.नारायण कुचे वडकुते, खा. विकास महात्मे, पुणे जि.प.अध्यक्ष रमेश शेंडगे, पोपटराव गावडे, माजीमंत्री बबनराव पाचपुते, भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आदी उपस्थित होते.

महाजन म्हणाल्या, मी आज येथे राजकारणावर बोलणार नाही खरे तर समाजच, व राष्ट्राचे हित म्हणजे राजकारण होय. माझ्या जीवनात मी अहिल्यादेवींना आदर्श मानते. कारण त्यांचे राजकारण हे खर्‍या राजकारण्याला शिकवण देणारे होते.ज्याप्रमाणे एक तरी ओवी अनुभवावी असे ज्ञानेश्वर माउलींनी सांगितले आहे, त्या प्रमाणे अहिल्यादेवींच्या जीवनातील एक तरी गुण आदर्श मानून प्रत्येकाने जीवन जगले पाहिजे. अहिल्यादेवींनी आपल्या जीवनात सुखापेक्षा दुःखच जास्त पहिले तरी त्या कर्तव्य करीत राहिल्या. आमच्या मवाळ प्रांतात त्यांना सर्व जातीधर्माचे लोक आई मानतात. मल्हारराव होळकर यांनी अहिल्यादेवींना सून म्हणून घरात आणले परंतु मुलगी म्हणून सांभाळले. तुमच्या तालुक्यातील जन्मलेली एक मुलगी ही  इंदोरची सुभेदारीन झाली व इंग्रजांनाही आपल्या मुठीत ठेऊन जगासमोर एक दीपस्तंभ म्हणून उभी राहिली. त्या राजमतेच्या जन्मभूमीला वंदन करण्यासाठी मी आज येथे आले असे म्हणून सुमित्रा महाजन यांनी अहिल्यादेवींच्या चरित्रावर सुमारे अर्धा तास भाषण केले.

स्वागताध्यक्ष पालकमंत्री राम शिंदे म्हणाले की, चौंडीमध्ये विकास कामे मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे गावात अमुलाग्र बदल होत आहे. समाजाचे अनेक प्रश्‍न आहेत ते सुटले पाहिजे. यातील जामखेड तालुक्यातील हाळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शासकीय कृषी महाविद्यालय सुरू होणार आहे. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवीचे नाव देणार आहे. त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली.