Mon, May 20, 2019 20:05होमपेज › Ahamadnagar › अहिल्यादेवींचे जन्मस्थळ पाथर्डीत!

अहिल्यादेवींचे जन्मस्थळ पाथर्डीत!

Published On: Jun 12 2018 12:51AM | Last Updated: Jun 11 2018 11:17PMपाथर्डी : प्रतिनिधी

राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान पाथर्डी शहरात असून तसा उल्लेख संत दासगणू महाराजांनी लिहिलेल्या पोथीत सुद्धा आहे. बहुसंख्य समाज बांधवांना याची कल्पना आहे. तसे पुरावे सुद्धा संकलित केले असून त्यादृष्टीने अहिल्याबाईंचा पुतळा शहरात उभारला जावा, यासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन इतिहासाचे अभ्यासक व धनगर समाजाचे ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ. नवनाथ वाव्हळ यांनी केले. 

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती सभागृहात रक्तदान शिबिर व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सोमनाथ खेडकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती विष्णूपंत अकोलकर, पंचायत समिती सदस्य सुनिल परदेशी, वृद्धेश्वरचे  संचालक चारुदत्त वाघ, गावडे महाराज, शिवाजी चोरमले, दिगंबर सोलाट, गोविंद दातीर, भाऊसाहेब मतकर, प्रा. अमोल आगाशे आदी उपस्थित होते. 

बहुसंख्य वक्त्यांनी अहिल्याबाईंच्या जन्मस्थान पाथर्डीत, तर जन्मगाव चौंडी असा उल्लेख केला. गेल्या काही वर्षांपासून समाजाच्या व्यासपीठावर अशी चर्चा उघडपणे सुरू असून चौंडी काय किंवा पाथर्डी काय, अहिल्याबाईंच्या नावाने विकास होतो. वाद वाढवू नका, असाही सल्ला समाजातील ज्येष्ठांकडून दिला जात आहे. संतकवी दासगणू महाराजांनी लिहिलेल्या पोथीमध्ये सुमारे शंभर वर्षांपूर्वी पूर्ण संशोधन करून उल्लेख केला आहे. अहिल्याबाईंची आई पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी म्हणजे पाथर्डीला आल्या होत्या, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. खोलेश्वर मंदिर परिसरात ते स्थान आहे. 

वाव्हळ म्हणाले की, इतिहासातून प्रेरणा घेऊन नवी पिढी पुढे चालते. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, वृद्धेश्वर, घाटशिरस, मिरी येथे अहिल्याबाई स्वतः उपस्थित रहात. मंदिरे, बारव, मंदिरापुढील ओवर्‍या बांधल्या. कसबा विभागातील खोलेश्वर तपनेश्वर, दगडमठामध्ये त्यांनी शिव आराधना केली आहे. 

समाजातील अभ्यासकांनी अशा  गोष्टींचा वस्तुनिष्ठ अभ्यास करून सामुहिक विकास साधावा. शासनाने चौंडीचा विकास जरूर करावा. त्यासाठी कुणाचा आक्षेप नाही. पण ज्या गावात अहिल्याबाईंचा जन्म झाला, त्या पाथर्डीमध्ये त्यांचा आश्वारुढ पुतळा व त्यांनी जेथे जेथे भेटी दिल्या, त्या स्थानांवर नीलफलक लावून माहिती द्यावी. यावेळी माजी सदस्य सोमनाथ खेडकर म्हणाले की, अहिल्याबाई होळकरांचे जन्मस्थान पाथर्डी असल्याने तेथे विकास कामे करताना पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खा. दिलीप गांधी, आ. मोनिका राजळे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आदींना या कामात सहभागी करून घ्यावे. पाथर्डी पालिकेकडून खुला भूखंड मिळवून तो समाजाने विकसित करावा. पाथर्डीचे नाव या निमित्ताने देशभर होईल. जन्मस्थळ व जन्मगाव दोन्ही नगर जिल्ह्यात असल्याने धनगर समाजाच्या दृष्टीने नगर जिल्हा तीर्थक्षेत्राइतका पवित्र आहे. संत भगवानबाबांंचे  समाधीस्थान तालुक्यात असून शहराचा विकास होऊन अहिल्याबाईंचे स्मारक झाल्यास वंजारी व धनगर समाजाचे नाते अधिक घट्ट होणार आहे. 

नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे  यांच्याशी पदाधिकार्‍यांनी चर्चा करून जागा निश्‍चित करावी. अश्वारूढ पुतळा, स्मारक व अन्य कामांसाठी आ. मोनिका राजळे व पंचायत समितीकडून सर्वतोपरी सहकार्य करू. प्रास्तविक अरुण मतकर, सूत्रसंचालन गणेश डोईफोडे, तर आभार प्रा. अमोल आगाशे यांनी मानले. आनंदऋषीजी रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान केले.