Mon, Apr 22, 2019 21:51होमपेज › Ahamadnagar › शेतकरी प्रश्‍नांबाबत सदैव सोबत : ना.विखे

शेतकरी प्रश्‍नांबाबत सदैव सोबत : ना.विखे

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 09 2018 12:23AMकोपरगाव : प्रतिनिधी

केंद्र व राज्य शासन शेती व शेतकर्‍यांच्या प्रश्‍नी गंभीर नाही. बि- बियाणांच्या बाबतीत आपण आजही स्वयंपूर्ण नाही. दुसर्‍यांचे तंत्रज्ञान वापरावे लागत असून आज सर्वांसमोर शेतकरी जगला पाहिजे, हे एक मोठे आव्हान आहे. शेतकरी स्पर्धेत टिकावा म्हणून जे जे प्रश्‍न उपस्थित होतील ते प्रश्‍न सोडविण्यासाठी शासन दरबारी मी आपणासोबत सदैव राहिल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

अग्रोइनपुट डिलरच्या पहिल्या महाधिवेशन समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. स्नेहलता कोल्हे, माफादाचे अध्यक्ष प्रकाश कवडे, खजिनदार आबासाहेब भोकरे यांच्यासह विविध राज्यातून आलेले प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सुलभ व्यापार या अ‍ॅपचे प्रातिनिधिक स्वरुपात विमोचन करण्यात आले .

ना. विखे म्हणाले, खते, बियाणाबाबत राज्य शासन मोठे-मोठे मासे (कंपनी) सोडून देत किरकोळ व्यापार्‍यांना वेठीस धरते. आज देशापुढे बायोटेक्नोलॉजी हे एक मोठे आव्हान आहे. कृषी व कृषीविषयक क्षेत्रातील धोरणे बदलावे लागतील, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री म्हणतात मात्र त्यांच्याकडे सत्ता व अधिकार असताना त्यांनी अशा गोष्टी बोलणे हे त्यांना शोभत नाही. मी शेतकरी आहे, कृषीमंत्री राहिलो आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या समस्यांची मला जाण आहे.आ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, मी आमदार या नात्याने शेतकर्‍यांच्या खते, बि-बियाणेंसह विविध समस्या सोडविण्यासाठी मी राज्यशासन दरबारी तुमच्यासाठी पाठपुरावा करून न्याय मिळवून देईल. मोदी शासनाने शेतकर्‍यांकडे आर्थिकदृष्ट्या त्यांना सबळ कसे करता येईल, हे धोरण ठेवल्याने आज शेतकर्‍यांना चांगले दिवस पहायला मिळत आहे. यावेळी माफादाचे माजी अध्यक्ष कैलास ठोळे, जि. प. सदस्य राजेश परजणे पदाधिकारी, व्यापारी उपस्थित होते. 

 

Tags : Kopargaon, Kopargaon news, AgroInput Dealer, general meeting