Sun, Apr 21, 2019 02:40होमपेज › Ahamadnagar › पंतप्रधान मोदींकडून शेतकर्‍यांना कृषिमंत्र

पंतप्रधान मोदींकडून शेतकर्‍यांना कृषिमंत्र

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 17 2018 11:39PMराहुरी : प्रतिनिधी

भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्‍ली येथे आयोजित ‘कृषि उन्नती मेळावा-2018’ च्या  उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशातील शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण शेतकर्‍यांना पाहता यावे यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि आत्मा, अहमदनगर यांच्या संयुक्‍त विद्यमाने डॉ. नानासाहेब पवार सभागृहात शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी कुलगुरु डॉ. के.पी. विश्‍वनाथा, खा. दिलीप गांधी, खा. सदाशिव लोखंडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोेकाटे, अधिष्ठाता (कृषि) डॉ. अशोक फरांदे, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, कुलसचिव डॉ. दिलीप पवार, नियंत्रक विजय कोते, विद्यापीठ अभियंता मिलींद ढोके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र पाटील, कृषिभूषण सुरसिंग पवार आदी उपस्थित होते.

यावेळी खा. दिलीप गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागर्र्दर्शनाचा हा क्षण ऐतिहासिक व शेतकर्‍यांना  प्रेरणा देणारा आहे. सन 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे. शेती व शेतकर्‍यांच्या विकासासाठी केंद्र शासन अनेक योजना राबवत आहे. राज्य शासनाने देखील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी जलयुक्‍त शिवार सारख्या योजना राबवत आहे. विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे आपल्या प्रास्तविकात म्हणाले, या थेट प्रक्षेपण होणार्‍या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान हे देशातील शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत. प्रकल्प संचालक भाऊसाहेब बर्‍हाटे  यांनी आत्माचे कृषि मित्रांमार्फत तंत्रज्ञानाचा प्रसार करणार असल्याचे सांगितले.

यावेळी विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉ. अनिल दुरगुडे यांनी जमीन आरोग्य व्यवस्थापन, डॉ. उत्‍तम होले यांनी कपाशीवरील शेंदरी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन, डॉ. किरण रघुवंशी यांनी डाळिंबावरील तेल्या रोगाचे व्यवस्थापन आणि प्रा. अजित सोनोने यांनी चारा पिकांचे व्यवस्थापन या विषयांवर शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. डॉ. बापुसाहेब भाकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन आभार मानले. सुमारे 700 शेतकर्‍यांनी पंतप्रधान यांच्या भाषणाचा आणि प्रशिक्षणाचा लाभ घेतला. 

Tags : Prime Minister Modi, Farmer, Agriculture, Mantra,