Tue, Apr 23, 2019 08:18होमपेज › Ahamadnagar ›  रोहित्रासाठी संतप्त शेतकर्‍यांचा ठिय्या 

 रोहित्रासाठी संतप्त शेतकर्‍यांचा ठिय्या 

Published On: Jan 19 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 10:45PMपारनेर : प्रतिनिधी     

पिके बहारात असताना क्षमता वाढविण्यासाठी काढून नेलेले जातेगाव येथील रोहित्र तब्बल दोन महिन्यांनंतरही बसविण्यात आलले नाही. त्यामुळे शिवसेना तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी संतप्त शेतकर्‍यांसह महावितरण कार्यालयात काल तासभर ठिय्या दिला. सहाय्यक अभियंता मंगेश प्रजापती यांनी रोहित्र तत्काळ बसविण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

रोहित्रावरील विजपंपांच्या जोडण्या वाढल्याने रोहित्र पूर्ण क्षमतेने काम करीत नव्हते. अतिरिक्‍त दाबामुळे रोहित्र जळणे, वारंवार वीज खंडीत होणे, पुरेशा दाबाने वीजपुरवठा न होणे, अशा तक्रारी शेतकर्‍यांकडून करण्यात येत होत्या. रोहित्र सुरू असूनही ते पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने त्याची असून अडचण व नसून खोळंबा अशी अवस्था होती. रोहित्रांची क्षमता वाढविण्यासाठी महावितरण कर्मचार्‍यांनी दोन महिन्यांपूर्वी रोहित्र काढून नेले. मात्र शेतकर्‍यांनी वारंवार मागण्या करूनही ते पुन्हा बसविण्यात आले नाही. त्यामुळे पाण्याअभावी पिके जळू लागली.

महावितरणकडून कार्यवाही न झाल्याने शेतकर्‍यांनी लंके यांच्याशी संपर्क साधला. लंके यांनी शेतकर्‍यांसह महावितरण कार्यालय गाठले. यावेळी कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने लंके यांनी उपअभियंता प्रजापती यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी कनिष्ठ अभियंत्यांना कार्यालयात पाठवून आंदोलकांशी चर्चा केली. मात्र सबंधित अभियंता ठोस अश्‍वासन देण्यास असमर्थ ठरल्याने लंके यांनी आपल्या सतप्त भावना प्रजापती यांच्या कानावर घातल्या. तसेच आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. त्यामुळे प्रजापती यांनी तत्काळ रोहित्र बसवून देण्याचे मान्य केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी विठ्ठल ढोरमले, विठ्ठल पोटघन, गवराम ढोरमले, गिरीश व्यवहारे, गुलाब जर्‍हाड, भाउसाहेब जर्‍हाड, बाळासाहेब पोटघन, पोपट जर्‍हाड, नारायण पोटघन, कारभारी पोटघन, सोपान पोटघन, फकिर पोटघन, संजय गायकवाड आदी उपस्थित होते.