Fri, Apr 19, 2019 12:00होमपेज › Ahamadnagar › पतीचा खून झाल्यानंतर पत्नी गप्प का?

पतीचा खून झाल्यानंतर पत्नी गप्प का?

Published On: Mar 01 2018 1:46AM | Last Updated: Mar 01 2018 12:05AMनगर : प्रतिनिधी

तांत्रिक माहितीच्या आधारे चार महिन्यानंतर राहुरी तालुक्यातील धरमवाडी टेकडीच्या पायथ्याशी झालेल्या खुनाचा उलगडा झाला आहे. अनैतिक संबंधाच्या कारणातून सख्ख्या भावानेच खून केल्याचे तपासातून स्पष्ट झाले. तथापि, या संबंधाची माहिती असूनही पतीचा खून झाल्यानंतर पत्नी तब्बल चार महिने गप्प का होती, याचे उत्तर अद्याप पोलिसांना मिळालेले नाही. त्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे. सखोल तपास केल्यास अनेक धक्कादायक गोष्टी रेकॉर्डवर येण्याची शक्यता आहे.

धरमवाडी टेकडीच्या पायथ्याशी 22 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता 30 वर्षीय अनोळखी पुरुषाचा दगडाने ठेचलेला चेहरा व नग्नावस्थेत मृतदेह आढळला होता. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तीन दिवस मृतदेहाची ओळख पटली नव्हती. तीन दिवसानंतर मयत हा पिंप्री अवघड (ता. राहुरी) येथील वीटभट्टीवरील कामगार असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे नाव किरण रावसाहेब शेलार होते.

परंतु, या गुन्ह्याचा तपास करण्यात राहुरी पोलिस अपयशी ठरले. मयताच्या नातेवाईकांना पोलिस ठाण्यात बोलावून घेत चौकशी केली. परंतु, पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. अखेर पेलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या आदेशानंतर सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील पवार यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. त्यात आरोपी हा घरातीलच असल्याचा संशय निर्माण झाला. पवार यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने ठाणे जिल्ह्यात जाऊन संशयित म्हणून अमोल रावसाहेब शेलार (वय 28, रा. तेलगाव, ता. मुरबाड, जि. ठाणे) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सख्खाभाऊ किरण याचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. आरोपी अमोल याचे मयत किरणच्या सासूशी अनैतिक संबंध होते. त्या संबंधात मयत किरण हा वारंवार अडथळा निर्माण करीत होता. तो राग मनात धरून अमोल याने सख्खा थोरला भाऊ किरण शेलार याचा दगडाने ठेचून खून केल्याचे पोलिसांना सांगितले.

घटनेच्या चार महिन्यानंतर पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासाच्या आधारे सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना आरोपी सापडला. परंतु, खुनाच्या घटनेनंतर तीन दिवस मयत किरण हा गायब असताना त्याच्या पत्नीने पोलिसांत साधी ‘मिसिंग’चीही तक्रार केली नाही. आई व दीर यांच्या अनैतिक संबंधाची माहिती असूनही खुनानंतर तब्बल चार महिने मयताची पत्नी गप्प होती, हे संशयास्पद आहे. मयताची पत्नी गप्प का होती, याचे उत्तर अद्याप राहुरी पोलिसांना मिळालेले नाही. त्यामागचे नेमके कारण काय, याचा उलगडा झालेला नाही. तो झाल्यास अनेक धक्कादायक गोष्टी उजेडात येणार असल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तविली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत.

आणखी एका अनैतिक संबंधाचा संशय

हा गुन्हा वाटतो तितका सोपा नाही. मुख्य आरोपी अमोल शेलार याच्या साथीदाराच्या चौकशीतून आणखी एक अनैतिक संबंध उघड होऊ शकेल. त्यातून या गुन्ह्यातील गुंतागुंत उजेडात येऊ शकते. दोन अनैतिक संबंधाच्या गुंतागुंतीमुळेच राहुरी पोलिसांना आरोपीला अटक करण्यात अडचण येत होती. त्यामुळे या गुन्ह्याचा अधिक गांभीर्याने तपास करण्याची आवश्यकता आहे.