होमपेज › Ahamadnagar › सतरा वर्षांनंतर ‘पळसुंदे’चे काम अखेर पूर्ण 

सतरा वर्षांनंतर ‘पळसुंदे’चे काम अखेर पूर्ण 

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 14 2018 12:01AMअकोले : प्रतिनिधी

तालुक्याच्या दक्षिण भागातील पुष्पावंती नदीवरील पळसुंदे धरणाचे काम अखेर पूर्ण झाले. यावर्षी या धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविले जाणार आहे. यावर्षी पिंपळगाव खांड धरणापाठोपाठ पळसुंदे धरणाचेही काम पूर्ण झाल्याने तालुक्याला आता अधिक पाणी उपलब्ध होऊ शकेल. माजी मंत्री मधुकरराव पिचड व आ. वैभवराव पिचड यांच्या सततच्या पाठपुराव्यांमुळे तालुक्यातील या दोन्ही धरणांची कामे पूर्ण झाली आहेत. 

पुष्पावंती नदीवरील  86 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणाच्या कामास मे-2001 मध्ये मान्यता मिळाली होती. त्यावेळी या धरणाचे बांधकाम माती व दगडी बांधकाम असल्याने त्याची किंमत अवघी 4 कोटी 58 लाख रुपये होती. मात्र, त्यानंतर धरणाच्या भिंतीचे बांधकाम कोलग्राऊट पद्धतीने करण्यास जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी मान्यता दिल्याने धरणाच्या कामाची किंमतही वाढली. मात्र, न्यायालयीन बाबींमुळे धरणाचे काम 2006 मध्ये बंद पडले. ते पुन्हा 2013 मध्ये सुरू झाले. मात्र, पुन्हा नैसर्गिक वाळूचा तुटवडा निर्माण झाल्याने काम परत एकदा सुमारे दीड वर्षे बंद पडले. वाळूची अडचण लक्षात घेऊन धरणाच्या भिंतीचे काम कृत्रिम वाळूमध्ये करण्यास मुख्य अभियंत्यांनी अखेर मान्यता दिल्याने बांधकामास वेग आला.

सरकारनेही या धरणाच्या कामासाठी 27 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. माजी मंत्री मधुकरराव पिचड व आ. वैभवराव पिचड यांच्या सततच्या पाठपुराव्यांमुळे हा निधी उपलब्ध झाला व अखेर अनेक अडथळे पार पाडत धरणाचे काम यावर्षी पूर्ण झाले. या धरणाच्या भिंतीची लांबी 190 मीटर आहे. धरणाचा सांडवा 27 मीटरचा असून धरणातून पाणी बाहेर काढण्यासाठी 900 मिलिमीटर व्यासाचा पाइप 113 मीटर तलांकावर टाकण्यात आला असून त्यास दोन वॉल बसविण्यात आले आहे. धरणातून पाणी सोडण्यासाठी अशा प्रकारचे आऊटलेट बसविण्याचा हा तालुक्यातील पहिलाच प्रकल्प आहे. इतर धरणाच्या दरवाजांची ऑपरेटिंग पद्धत धरणाच्या भिंतीवर आहे. येथे मात्र, भिंतीच्या तळाशी ही सिस्टिम असल्याने ती अधिक सुलभ राहणार आहे. शिवाय यास देखभाल खर्चही नाही. गंज पकडण्याचा प्रश्‍न नाही. हा दरवाजा शेतकरीही ऑपरेट करू शकतात. 

धरणाच्या खालील बाजूस सात बंधारे असून या दरवाजाचा वॉल फिरवून शेतकर्‍यांनाही बंधारे भरून घेता येतील. शिवाय इतर गेटपेक्षा या गेटचा खर्चही 50 ते 60 लाख रुपयांनी कमी असल्याचे शाखा अभियंता शरद कांबळे यांनी सांगितले. 

धरणाच्या खालच्या बाजूस पुष्पावंती नदीवर सात बंधारे बांधलेले असून, हे बंधारे भरून घेण्यासाठी या गेटमधून उन्हाळ्यात पाणी सोडले जाणार आहे. या धरणाच्या पाण्यामुळे सातेवाडी, पळसुंदे व उंबरेवाडी या गावांमधील सुमारे पाचशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून 100 टक्के लाभार्थी आदिवासी समाजाचे आहेत. सिंचनाबरोबरच या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही या धरणामुळे मार्गी लागला आहे.