होमपेज › Ahamadnagar › दारूबंदी असूनही दीड लाखांची दारू जप्त

दारूबंदी असूनही दीड लाखांची दारू जप्त

Published On: May 14 2018 1:42AM | Last Updated: May 14 2018 12:23AMपारनेर : प्रतिनिधी   

सहायक पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तालुक्यातील निघोज येथील सहा हॉटेलवर छापे टाकून 1 लाख 34 हजार 397 रुपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि.12) रात्री उशिरा ही कारवाई केली. याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली. निघोजमध्ये बिंगो जुगाराबरोबरच मटका, जुगार तसेच बेकायदेशिर दारू विक्री जोरात सुरू असल्याचे वृत्त दैनिक पुढारीने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत सहायक पोलिस अधीक्षक कलवानिया यांनी अवैध व्यवसायांवर टाच आणण्यासाठी विशेष योजना आखली. शनिवारी रात्री नगरच्या पोलिसांच्या मदतीने एकाच वेळी सहा हॉटेलांवर छापे टाकून देशी-विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला. 

पोलिसांच्या पथकाने संदीप हॉटेलवर छापा टाकला असता, तेथे बेकायदा विक्रीसाठी दारूचा साठा नुकताच आणण्यात आला होता. त्या साठ्यासह गोदामातील एकूण 68 हजार 232 रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात येऊन हॉटेलचालक संतोष रतन वरखडे यास अटक करण्यात आली. जत्रा हॉटेलवरील छाप्यात 2 हजार 912 रुपये किमतीची दारू हस्तगत करण्यात येऊन मालक गणेश भाऊ भुकन यास अटक करण्यात आली. राजयोग हॉटेलचा चालक संतोष सावकार साळवे याच्याकडे 11 हजार 20 हजार रुपयांची दारू आढळून आल्याने दारू ताब्यात घेऊन साळवे यास अटक करण्यात आली. मंथन हॉटेलवरील छाप्यात 12 हजार 779 रुपये किमतीची देशी-विदेशी दारू आढळून आली. तेथे मालक राहुल राजू लाळगे यास अटक करण्यात आली.

आपली जत्रा हॉटेलमध्ये मंगेश बाळासाहेब लाळगे हा बेकायदा दारू विक्री करताना आढळून आला. हॉटेलची झडती घेतली असता, 5 हजार 132 रुपयांची देशी-विदेशी दारू आढळली. मंगेश लाळगे यास अटक करण्यात आली. विजय हॉटेलवरील छाप्यात 34 हजार 322 रुपयांचा साठा आढळून आला. हॉटेलमालक विजय पोपट वराळ यास अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेला दारूसाठा, तसेच आरोपींना पारनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. गंगाधर फसले, शिवाजी कावडे व अशोक निकम यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केल्या आहेत.

राज्य उत्पादन शुल्क संशयाच्या भोवर्‍यात

महिलांच्या मागणीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने निघोजमध्ये दारूबंदीची अंमलबजावणी केली. त्यानंतर मात्र या विभागाचे अधिकारी-कर्मचारी वारंवार निघोजमध्ये येत असताना त्यांना ही दारूविक्री दिसली नाही का, वृत्तपत्रात बातम्या आल्यानंतरही कारवाई का करण्यात आली नाही, अशा अनेक अनुत्तरित प्रश्‍नांमुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग संशायच्या भोवर्‍यात सापडला आहे.