होमपेज › Ahamadnagar › तिखोलला मिळाली ७० वर्षांनी दूरसंचार सेवा !

तिखोलला मिळाली ७० वर्षांनी दूरसंचार सेवा !

Published On: Jul 26 2018 1:30AM | Last Updated: Jul 25 2018 10:17PMपारनेर : प्रतिनिधी - 

मोबाई मनोरा कार्यान्वीत झाला अन् दूरसंचार सुविधांपासून वंचित असलेले तिखोल हे गाव स्वातंत्रप्राप्तीनंतर तब्बल 70 वर्षांनी प्रथमच जगाशी जोडले गेले! इंटरनेट सुविधांमुळे मोबाईल हा मानवाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेला असताना चोहोबाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या तिखोलमधील ग्रामस्थ मात्र मोबाईल रेंजच्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत होते. बाजार समितीचे माजी सभापती अरुण ठाणगे यांनी पाठपुरावा करून मनोरा कार्यान्वित करून घेतला व तिखोलकरांच्या आनंदाला अक्षरशः उधाण आले ! 

मोबाईलपूर्वी दूरसंचार विभागाचे दूरध्वनी हे संपर्काचे प्रमुख साधन होते. तालुक्यात या सेवेचाही मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. परंतु डोंंगररांगांत वसलेल्या तिखोलमध्ये मात्र दूरध्वनीचीही सुविधा नव्हती. परिणामी एखाद्या तातडीच्या निरोपासाठी टाकळीढाकेश्‍वर किंवा कान्हूरपठार येथे जाऊन दूरध्वनी करण्याची वेळ ग्रामस्थांवर येत असे. रात्रीची वेळ असेल, तर त्यात आणखी अडचणी येत. गेल्या काही वर्षांत मोबाईची क्रांती झाली. आता तरी गावास दूरसंचार सुविधा उपलब्ध होईल, अशी आशा ग्रामस्थांना होती. परंतु डोंगरांमुळे त्यात अनंत अडचणी येत. तालुक्याच्या दुर्गम भागापर्यंत मोबाईल सेवा पोहचलेली असताना पारनेर, कान्हूर तसेच टाकळीढोकेश्र पासून जवळ असलेले तिखोल मात्र मोबाईल सेवेपासून वंचित होते. 

तालुक्यातील ढोकी येथील रहिवासी सुनील गोसावी यांच्याशी सरपंच संगीता ठाणगे, तसेच अरुण ठाणगे यांनी संपर्क करून मनोरा उभारण्याबाबत पाठपुरावा केला. एका खासगी कंपनीने तिखोलला मनोरा उभारला. इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्याने आता ग्रामपंचायतीचे ऑनलाईन दाखले, तसेच स्वस्त धान्य दुकानातील धान्य पॉस मशिच्या माध्यमातून वितरीत करण्यात येईल, असे सरपंच ठाणगे यांनी सांगितले. माजी सरपंच विठ्ठल ठाणगे यांनी मनोरा कार्यान्वीत केला. यावेळी जालिंदर ठाणगे, नागचंद ठाणगे, शिवाजी ठाणगे, मिठू इनामदार, सुनील ठाणगे, भानुदास ठाणगे, अविनाश ठाणगे, दादा शेंडगे, संतोष मंचरे, सुहास ठाणगे, राजू पुरी उपस्थित होते.