होमपेज › Ahamadnagar › मनुवाद्यांशी सर्व ताकदीनिशी एकत्र लढू

मनुवाद्यांशी सर्व ताकदीनिशी एकत्र लढू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मढीः वार्ताहर

मनुवाद्यांना सत्तेपासून रोखून देशात हुकूमशाही थोपवायची असेल तर आरपारच्या लढाईसाठी सज्ज व्हा. मनुवाद्यांबरोबरच शेवटचा लढा सर्व ताकदीनिशी एकत्रितपणे लढू. एक तर ते संपतील नाहीतर आपण थांबू. समविचारी कार्यकर्ते एकत्र आले तर परिवर्तन कुणी रोखू शकत नाही, अशा विश्वास भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

पाथर्डी तालुक्यातील मढी येथे राज्यस्तरीय भटक्या विमुक्त कार्यकर्त्यांच्या चिंतन परिषद समारोप प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री लक्ष्मण माने, अ‍ॅड. विजय मोरे, प्रा. किसन चव्हाण, अ‍ॅड. अरूण जाधव, शारदा खोमणे, दीपक साळवे, मलू शिंदे, भरत वीटकर, स्मिता पानसरे, अशोक गायकवाड, कॉ. अंनत लोखंडे, अंकुश कानडे, श्रीकांत बोरडे, मानवेंद्र वैदू आदी प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले, राज्यघटना बदलू द्यायची नसेल तर आपण सत्तेत बसलो पाहिजे. सध्याचा काळ वर्चस्वाचा असून व्यवस्थेशी लढा त्याचाच भाग आहे. संभाजी भिडे यांनी फार चांगले राजकारण हाती घेतले असून 1948 चा वचपा काढत आहेत. त्यांचा सर्वात मोठा रोख मराठा समाजावर आहे. गांधीवादी मराठा विरूद्ध वैदिक मराठा असा वाद काढला जातोय. आगामी काळात देशात संघर्ष अटळ असून तो निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे. जाणीवपूर्वक वाद वाढवला जात आहे. दबावासाठी ऐक्याची ताकद वाढवावी लागेल. विधानसभेच्या जागांचा विचार करून ऐक्याची प्रक्रिया जुळवावी लागेल.

माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने म्हणाले, भटक्या समाजाच्या बदलत्या रचनेकडे राज्यकर्त्या प्रमाणेच माध्यमांचे लक्ष नाही. शत्रूच्या कळपामध्ये सामाविष्ट झालेली जनावरे कापली पाहिजेत, असे म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे विरुद्ध टीका केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समुद्राच्या तळाशी बुडवणसाठी काहीही करायला तयार आहोत. पुन्हा यांचे राज्य येता कामा नये. त्यांची ‘मन की बात’ कितीदा ऐकणार? आपली ‘मन की बात’ त्यांना मात्र कळत नाही.  मागसवर्गीय, धनगर, भटके व वंजारी समाजाने एकत्र आल्यास या देशाची व्यवस्था ताब्यात घेण्याची शक्ती आपल्यात आहे. पुण्यात पुढील महिन्यात पाच लाखांपेक्षा अधिक कार्यकत्यांच्या उपस्थित भटक्यांचा मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. 

अ‍ॅड.आंबेडकरांचे भाषण होणार म्हणून जिल्ह्यातून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मढी देवस्थान समितीच्या वतीने अ‍ॅड.आंबेडकरांचे  अध्यक्ष अण्णासाहेब मरकड, सचिव सुधीर मरकड, माजी सरपंच देविदास मरकड व विश्वस्तांनी स्वागत केले.


  •