Thu, Jul 18, 2019 08:38होमपेज › Ahamadnagar › अ‍ॅड. निकम यांची नियुक्‍ती!

अ‍ॅड. निकम यांची नियुक्‍ती!

Published On: Jul 18 2018 1:52AM | Last Updated: Jul 17 2018 10:17PMनगर : प्रतिनिधी

केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्‍ती करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (दि.17) शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिल्याचे शिवसेना प्रवक्त्या आ. निलम गोर्‍हे यांनी सांगितले. दरम्यान, नगर शहरात दहशत अद्यापही कायम आहे. आ. शिवाजी कर्डिले व आ. संग्राम जगताप यांच्याकडून प्रकरण दडपण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.

सुनीता कोतकर, अनिता ठुबे, संग्राम कोतकर, प्रमोद ठुबे, नगरसेवक योगीराज गाडे, प्रशांत भाले यांच्या शिष्टमंडळाने आ. गोर्‍हे, आ. अनिल परब, आ. नरेंद्र दराडे, आ. विलास पोतनीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेतली. त्यात अ‍ॅड. निकम यांची सरकारकडून नियुक्‍ती करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नगर शहरात दहशत अद्यापही कायम आहे. आ. कर्डिले व आ. जगताप यांच्याकडून प्रकरण दडपण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितले. कोतकर व ठुबे कुटुंबियांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे दिली जावीत. आरोपींवर एमपीडीए व मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी सुवर्णा कोतकरला अटक झालेली नाही. शिवसैनिकांच्या हल्ला करण्याचा कट रचणारे मुख्य सूत्रधार आजही राजकीय संरक्षणात मोकाट फिरत आहेत. मुख्यमंत्र्यांचे व गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांचे याकडे लक्ष वेधले आहे. तसेच विधानसभा व विधान परिषदेतही याबाबत लक्षवेधी करण्यात आल्याचे आ. गोर्‍हे यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

पोलिस अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी!

केडगाव येथे शिवसैनिकांची हत्या घडण्यापूर्वी त्या परिसरातील तणाव व दहशतीबाबत पोलिस अधिकार्‍यांना एक दिवस आधीच माहिती देण्यात आली होती. त्यांनी दखल घेतली नाही. या अधिकार्‍यांवर तात्पुरती कारवाई केल्याचे दाखविण्यात आले. याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले असल्याचे व अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आल्याचे शिवसेना प्रवक्त्या आ.नीलम गोर्‍हे यांनी सांगितले.