Tue, Jul 16, 2019 02:17होमपेज › Ahamadnagar › ‘आदर्श ग्राम’ला ‘स्मार्ट’मध्ये ‘नो एन्ट्री’!

‘आदर्श ग्राम’ला ‘स्मार्ट’मध्ये ‘नो एन्ट्री’!

Published On: Jan 25 2018 1:03AM | Last Updated: Jan 24 2018 10:40PMनगर : प्रतिनिधी

आदर्श ग्रामसाठी शासनाचा पुरस्कार मिळालेला असतांनाही तीच-तीच विकासकामे दाखवून स्मार्ट ग्राम स्पर्धेत सहभागी होणार्‍या गावांना राज्य शासनाने दोन वर्षे सहभाग घेण्यावर बंदी आणली आहे. अशा गावांना दोन वर्षे स्मार्ट ग्रामसाठी विचारात न घेण्याचा शासन निर्णयच काढण्यात आल्याने अनेक गावांची गोची होणार आहे.

राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यास प्रोत्साहन देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी शासनाने स्मार्ट ग्राम योजना सुरु केली. सदर योजनेत तालुकास्तरावरून निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात येतो. तसेच तालुकास्तरावरून स्मार्ट ग्रामसाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींना जिल्हास्तरावरून तपासणी करून जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येतो.

स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत निकषानुसार जिल्हा स्तरावर निवड झालेल्या गावाचे नाव तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम म्हणून निवडण्यात येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. तसेच तालुका स्तरावर स्मार्ट ग्राम म्हणून घोषित केलेल्या ग्रामपंचायतीला त्याच विकास कामाच्या आधारे जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी विचार करण्यात येतो. स्मार्ट ग्रामसह शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात.

अनेक ग्रामपंचायतींच्या पदाधिकारी- अधिकार्‍यांकडून तीच - तीच विकासकामे शासनाच्या विविध योजनांमध्ये दाखविण्यात येतात. यामुळे इतर गावांना संधी मिळत नसल्याचे शासनाच्या लक्षात आले. जिल्ह्यातील स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायतींना त्याच विकास कामाच्या आधारे पारितोषिक न देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.