Thu, Jul 18, 2019 16:51होमपेज › Ahamadnagar › डॉ. विखे दक्षिणेचे भावी खासदार!

डॉ. विखे दक्षिणेचे भावी खासदार!

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 24 2018 11:42PMकर्जत : प्रतिनिधी

डॉ. सुजय विखे नगर दक्षिण मतदारसंघाचे भावी खासदार असून, ते आम्हा सर्व महिला भगिनींसाठी पोस्टर बॉय आहेत, असे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी कर्जत येथे हजारोंच्या उपस्थितीमध्ये जाहीर केले आणि त्यावेळी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट येथे झाला.

कर्जत येथे जनसेवा फाउंडेशन, कर्जत पंचायत समिती, महिला विकास महामंडळातर्फे सक्षम महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे आयोजन डॉ. विखे यांनी केले असून, त्याचे उद्घाटन सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी अंबादास पिसाळ, प्रवीण घुले, दादासाहेब सोनमाळी, कैलास शेवाळे, मंगल भुजबळ, बापूराव गायकवाड, संतोष मेहत्रे, डॉ. राजकुमार आंधळकर, संग्राम पाटील, संदीप बरबडे, श्रीहर्षल शेवाळे, सुनंदा पिसाळ यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

कुलकर्णी म्हणाल्या, आज महिला व मुली सक्षम नसण्यास आपणच जबाबदार आहोत. पोस्टर गर्ल चित्रपटातील भूमिकेमुळे लोकांना मुलींचे व स्त्रियांचे महत्त्व समजले. आज नगर जिल्ह्यात महिला सक्षम होण्यासाठी डॉ. विखे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ते जिल्ह्याचे पोस्टर बॉय आहेत. आजचा कार्यक्रम फक्‍त महिलांसाठी आहे. त्यामुळे चांगली संधी विखे यांनी निर्माण करून दिली आहे. त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. राजकारणात आता चांगल्या लोकांची गरज आहे. महिलांनी ठरविले, तर डॉ. विखे हे खासदार होणार, यामध्ये काहीच शंका नाही, असे कुलकर्णी म्हणताच उपस्थितांनी जल्लोष केला.

युवकांवर संस्काराची गरज

आजही मुलगी व मुलगा हा भेद करण्यात येत आहे. वास्तविक पाहता दोघेही समान आहेत.असे असतानाही  मुली आणि महिला सुरक्षीत नाहीत, याचे कारण घरामधून मुलांवर संस्कार कमी पडत आहेत हेच आहेत. आपल्या मुलांना गावातील मुलींचा सन्मान करावा, याची शिकवण देण्याची गरज आहे. सर्व युवकांनी पुढाकार घेऊन त्यांची सुरक्षा करावयाची आहे. याची सुरवात आपल्या गावापासून करावी, असे आवाहान कुलकर्णी यांनी केले. 

यावेळी बोलताना डॉ. विखे म्हणाले, जनसेवा फाउंडेशनच्या वतीने कर्जतमध्ये महिलांसाठी कार्यक्रम घेतला आहे. हा तालुक्यातील महिलांसाठी पहिला कार्यक्रम आहे. महिला बचतगटांना सक्षम करण्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे. असा कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात होणार आहे. आम्ही तालुक्यातील महिलांना रोजगार मिळावा, त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी, या हेतून हा महामेळावा घेतला आहे.  या बचगटांची 1 कोटीपेक्षा जास्त उलाढाल होणार आहे. बचत गटांचा मेळावा घेण्यास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी सुरुवात केली. आता या बचतगटांना प्रवरा सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्ज देणार आहे. 

यावेळी डॉ. विखे यांनी कर्जत शहरातून रात्री सात नंतर जाण्यासाठी एसटी बस नसल्याबद्द नाराजी व्यक्त करताना हा तालुका विकासापासून किती दूर आहे, हे लक्षात येते. मात्र हे सर्वांना बरोबर घेऊन चित्र बदलू, असे ते म्हणाले. तीन दिवस चालणार्‍या सर्व कार्यक्रमास नागरिक व महिला यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विखे यांनी केले. यावेळी मोनिका कांबळे यांचे भाषण झाले. आभार दादासाहेब सोनमाळी यांनी मानले.