Thu, Apr 25, 2019 13:57होमपेज › Ahamadnagar › साचलेला कचरा पेटविल्यास होणार कारवाई!

साचलेला कचरा पेटविल्यास होणार कारवाई!

Published On: May 18 2018 1:13AM | Last Updated: May 17 2018 10:57PMनगर : प्रतिनिधी

शहरातील कचरा पूर्णपणे उचलला जात नसल्याने कचर्‍याचे ढीग साचून ते पेटविण्याचे प्रकार वाढले आहेत. अधिकार्‍यांनी यात व्यक्‍तिशः लक्ष घालून कचरा पूर्ण क्षमतेने उचलण्याची कार्यवाही करावी. कचरा जाळणार्‍या नागरिकांना समज देण्यात यावी. शहर व उपनगरात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडल्यास अधिकारी व कर्मचार्‍यांनाच जबाबदार धरण्यात येईल, अशा शब्दांत महापौर सुरेखा कदम यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

एप्रिल महिन्यात कचरा पेटविल्यामुळे शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा स्टुडिओ आगीत खाक झाला होता. त्यानंतर महापौरांनी याबाबत घनकचरा विभागाला सूचना देऊन असे प्रकार होऊ नयेत, यासाठी उपाययोजनांचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही कचरा जाळण्याचे प्रकार शहरात सर्रास सुरुच आहेत. काही भागांत नागरिकांकडून तर काही ठिकाणी मनपाचे कर्मचारीच कचरा जाळत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात काल (दि.17) महापौर कदम यांनी अधिकारी, पदाधिकार्‍यांची बैढक घेतली. यावेळी उपमहापौर अनिल बोरुडे, सभापती बाबासाहेब वाकळे, सभागृह नेते गणेश कवडे, सभापती सारिका भुतकर, उपसभापती सुनीता मुदगल, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक संजय शेंडगे, वैद्यकीय आरोग्याधिकारी अनिल बोरगे, आरोग्याधिकारी एन. एस. पैठणकर आदींसह प्रभाग अधिकारी उपस्थित होते.

कचरा पूर्ण क्षमतेने न उचलल्यामुळे अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग साचतात. त्यामुळे नागरिकांकडून कचरा पेटविण्याच्या घटना घडतात. तसेच काही ठिकाणी कर्मचारीही कचरा जाळत असल्याचे निदर्शनास आल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यांच्यावर कारवाई केल्यास अधिकार्‍यांना ‘टार्गेट’ करण्याचे प्रकार होऊ शकतात. याबाबत कर्मचारी युनियनशीही चर्चा करावी, असेही महापौरांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. महापौर कदम यांनी कचरा पूर्ण क्षमतेने उचलण्याच्या कार्यवाही बाबत सूचना देऊन पुन्हा असे प्रकार घडल्यास अधिकारी व कर्मचार्‍यांना जबाबदार धरले जाईल, अशी तंबी दिली. नागरिकांनाही कचरा न पेटविण्याबाबत समज देण्यात यावी, असे त्यांनी त्यांनी सांगितले.