Tue, Jul 23, 2019 11:30होमपेज › Ahamadnagar › विनापरवाना कापूस खरेदी केंद्रांवर करणार कारवाई

विनापरवाना कापूस खरेदी केंद्रांवर करणार कारवाई

Published On: Jul 29 2018 1:20AM | Last Updated: Jul 29 2018 12:03AMनगर : प्रतिनिधी

जिल्हाभरातील मोठया प्रमाणात कपाशी खरेदी केंद्र असून, या केंद्रांची लवकरच तपासणी करा. या तपासणीत विनापरवाना खरेदी केंद्र आढळल्यास  तात्काळ कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल  द्विवेदी यांनी दिला. कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी शेतकर्‍यांच्या  प्रत्यक्ष शेतावर जाऊन, कृषी अधिकारी व कर्मचार्‍यांनी मार्गदर्शन करावे, असे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले. 

बोंडअळी प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी कृषी अधिकारी तसेच जिल्ह्यातील जिनिंग मालक यांची बैठक घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, उपवनसंरक्षक एम. आदर्श रेड्डी,  उपजिल्हाधिकारी (रोहयो) वामन कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  पंडीतराव  लोणारे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. 

जिल्ह्यात शेवगाव, पाथर्डी, कर्जत आणि श्रीगोंदा येथे जिनिंग आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात कापसाची आवक होते. जिनिंगच्या माध्यमातून गावांमध्येही  खरेदी केंद्रे सुरु असतील तर तेथील जागा स्वच्छ ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. विनापरवाना कपाशी खरेदी केंद्र जेथे कोठे असतील, ते शोधून त्यावर कडक कारवाई केली जाईल, त्यांनी स्पष्टपणे बजावले. बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधक उपाययोजना आणि शेतकर्‍यांना मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. राज्य शासन या प्रश्नावर गंभीर असून, त्यांनीही बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठीच्या उपाययोजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोतचवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कृषी विभागाने याप्रश्नाचे गांभीर्य समजून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिले. 

बोंडअळी प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालये आणि कृषी विज्ञान केंद्रांचे सहकार्य घेऊन अधिकाधिक शेतकर्‍यांपर्यंत प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे मार्गदर्शन त्यांना केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.