Thu, Jul 18, 2019 00:29होमपेज › Ahamadnagar › शहरात अनधिकृत धार्मिक स्थळांवर पुन्हा कारवाई!

शहरात अनधिकृत धार्मिक स्थळांवर पुन्हा कारवाई!

Published On: May 12 2018 1:23AM | Last Updated: May 11 2018 11:54PMनगर : प्रतिनिधी

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवरील थांबलेली कारवाई पुन्हा सुरु होण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात शासनाने काही दिवसांपूर्वीच आढावा घेवून मनपा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. 1960 पूर्वीच्या धार्मिक स्थळांबाबतही शासनाने सविस्तर माहिती घेतली असून त्यावरील कारवाईचा निर्णय येत्या 10 ते 15 दिवसांत मनपाला कळविण्यात येणार असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

2008 नंतरच्या 4 धार्मिक स्थळांवर डिसेंबर 2016 पूर्वी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर रस्त्याला अडथळा ठरणार्‍या 105 धार्मिक स्थळांवरील कारवाईला मनपाने सुरुवात केली होती. आंदोलने, मोर्चे आदींचा विरोध पत्करुन न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईला सुरुवात करण्यात आली. 17 नोव्हेंवर 2017 पर्यंत ही कारवाई पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, शहरात विविध राजकीय पक्ष, संघटना व नागरिकांच्या विरोधानंतर 17 धार्मिक स्थळे निष्कासीत करुन ही कारवाई थांबविण्यात आली होती.

न्यायालयाने कारवाईचा दिलेला आदेश अद्यापही कायम असल्याने शासनाने काही दिवसांपूर्वीच या संदर्भात मनपाकडून आढावा घेतला. मनपाने 68 पैकी एका धार्मिक स्थळाचा 1960 पूर्वीच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे 67 पैकी 17 स्थळांवरील कारवाई पूर्ण झाली असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. मनपाकडून सुरु असलेल्या कारवाईत केवळ मंदीरांचाच समावेश असल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीची माहितीही यावेळी देण्यात आली. 1960 पूर्वीच्या 34 धार्मिक स्थळांची माहिती शासनाच्या समितीकडे सादर करण्यात आली आहे. यात दर्गा, पीर, मशिद आदी मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. या संदर्भात शासनाला प्रत्येक धार्मिक स्थळाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर उर्वरीत 50 धार्मिक स्थळांवरील कारवाई पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच 1960 पूर्वीच्या यादीबाबत राज्यस्तरीय समितीकडून लवकरात लवकर निर्णय घेऊन मनपाला कळविण्यात येईल, असेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.