Tue, Apr 23, 2019 20:18होमपेज › Ahamadnagar › चौकशी अहवालावर दोन दिवसांत कारवाई

चौकशी अहवालावर दोन दिवसांत कारवाई

Published On: Feb 07 2018 1:35AM | Last Updated: Feb 06 2018 11:12PMनगर : प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरतीबाबत गैरप्रकार झाल्याचे लक्षात आल्यानंतर भरतीला स्थगिती देण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी तालुका उपनिबंधक राम कुलकर्णी यांनी करून चौकशी अहवाल विभागीय सहनिबंधकांना सादर केला होता. या चौकशी अहवालावर येत्या दोन दिवसांत कारवाई करणार असल्याची माहिती विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी दिली.

भरतीत अस्तित्वात नसलेल्या नियमांवर बोट ठेवत, पात्र उमेदवारांना डावलण्यात आले होते. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला सर्वप्रथम ‘दै. पुढारी’ने वाचा फोडली होती. त्याबाबत चौकशी सुरु होती. जिल्हा बँकेतील लेखनिक, कनिष्ठ लिपीक, द्वितीय श्रेणी अधिकारी व प्रथम श्रेणी अधिकारी अशा एकूण 464 पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. भरती प्रक्रियेदरम्यान मुलाखतीच्यावेळी डावलले गेलेल्या उमेदवारांनी सहकार आयुक्तांसह राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रारी केल्या होत्या.

पतसंस्थेतील कामाच्या अनुभवाचा दाखला असलेल्या उमेदवारांना द्वितीय श्रेणी मुलाखत प्रक्रियेदरम्यान अपात्र ठरविण्यात आले होते. बँकेतील जुन्या कर्मचार्‍यांना वर्ग 2 साठी पदोन्नती देण्याकरिताच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अपात्र ठरविण्याचा प्रयत्न असल्याचे आक्षेप घेण्यात आले होते. याबाबत ‘दै. पुढारी’ने वेळोवळी वृत्त प्रसिद्ध करीत त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली होती. त्यानंतर शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनीही पुण्यात सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यावर या उमेदवारांना जिल्हा बँकेकडून लेखी उत्तर घेऊन देण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले होते.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या भरतीबाबत तक्रार केली होती. भरती प्रक्रियेसाठी नेमलेल्या त्रयस्थ संस्थेवर बँकेचे पदाधिकारी व अधिकार्‍यांचा दबाव असणे, भरतीसाठी परीक्षा घेतल्यानंतर उमेदवारांचे गुण जाहीर न करणे, पदाधिकारी व अधिकार्‍यांचे नातेवाईक लेखी परीक्षेच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थानी असणे, भरतीचे निकष-नियमांची लेखी प्रत देण्यास बँक प्रशासनाकडून टाळाटाळ करणे, असे अनेक आक्षेप घेण्यात आले होते. गंभीर तक्रारी असल्याने पुन्हा चांगल्या त्रयस्थ यंत्रणेमार्फत लेखी परीक्षा, मुलाखती घेऊन अंतिम निवड यादी जाहीर करावी, अशी मागणीही अण्णा हजारे यांनी केली होती. हजारे यांच्या तक्रारीनंतर प्रकरणाची गंभीर दखल घेत भरती प्रक्रीयेला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर तालुका उपनिबंधकांनी चौकशी अहवाल विभागीय सहनिबंधकांना सादर केला होता. या अहवालावर कारवाई कधी होणार याबाबत उत्सुकता होती. आता दोन दिवसांत कारवाई होणार असल्याने भरती प्रक्रीयेबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.