खेड : वार्ताहर
पुणे आणि नगर जिल्ह्याच्या संयुक्त महसूली हद्दीचा गैरफायदा घेत भीमा नदीपात्रात अनाधिकृत वाळू उपसणार्या 8 बोटी महसूल प्रशासनाने फोडल्या. पुणे येथील उपजिल्हाधीकारी रमेश काळे, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, कर्जतचे तहसीलदार किरण सावंत, दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
नदीपात्राच्या दौंड, इंदापूर, कर्जत या तीनही तालुक्याच्या हद्दीत ठिकठिकाणी वाळू तस्करांनी आपले बस्थान बसविले आहे. दौंड तालुक्याच्या राजेगाव, नायगाव, वाटलूज, तर कर्जतच्या भांबोरा, सिद्धटेक, बाभूळगाव, खेड आदी भागात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. अनधिकृत वाळू उपसणार्या बोटी दररोज नदीपात्रातील शेकडो ब्रास वाळू उचलीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेकडो वेळा होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
झालेल्या या कारवाईमुळे भीमाकाठच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या पथकाने बोटी जिलेटिंगच्या सहाय्याने स्फोट करून पाण्यात बुडविल्या. त्यामुळे वाळू चोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. काहींनी कारवाईची चाहूल लागताच वाळू चोरी करणार्या बोटींसह नदीपात्रातून पलायन केले. तवेगाव (ता.दौंड) या ठिकाणी वाळू चोरी रोखण्यासाठी दिवस-रात्रं महसूल, पोलिस, वन कर्मचार्यांचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे वाळू चोरीला काही प्रमाणात आळा बसला आहे.
तलाठी विश्वास राठोड, नंदकुमार गव्हाणे, अविनाश रोडगे, साईनाथ थोरात, मंडलाधिकारी मंगेश नेवसे, सुनील जाधव, हरिश्चंद्र फरांदे, बालाजी जाधव, दीपक पाढरपट्टे ,जयंत भोसले, एम. पी. भिसे यांच्यासह वनकर्मचारीही या कारवाईत सहभागी झाले होते.
ज्याचे खावे मीठ त्याचे करावे नीट!
भीमा नदीपात्रात सध्या दीडशेहून अधिक यांत्रिक बोटी आहेत. मात्र त्यातील काही तस्करांचे महसूल अधिकार्यांशी चांगले सबंध आहेत. त्यामुळे होणार्या कारवाईबाबत त्यांना आधीच माहिती मिळते, असे बोलले जात आहे. ज्याचे खावे मीठ त्याचे करावे नीट, ही म्हण काही अधिकार्यांनी तंतोतंत पाळली असल्याचा आरोप होत आहे.
Tags : Ahamanagar, Ahamanagar news sand boat, Action, Bhima river bank,