Tue, May 21, 2019 18:17होमपेज › Ahamadnagar › सीनेतील पक्‍की बांधकामे जमिनदोस्त

सीनेतील पक्‍की बांधकामे जमिनदोस्त

Published On: Jun 15 2018 1:03AM | Last Updated: Jun 15 2018 12:28AMनगर : प्रतिनिधी

सीना नदी पात्रातील पक्‍की बांधकामे जमिनदोस्त करण्यास आत महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने सुरुवात केली आहे. काल (दि.14)काटवन खंडोबा रस्ता कमान, नवीन टिळक रस्त्यावरील पात्रातील 20 पक्‍की बांधकामे आणि 10 लोखंडी टपर्‍या काढण्यात आल्या. येथील बजविलेली गटार मोकळी करण्यात आली.

जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्‍त राहुल द्विवेदी यांनी धडक भूमिका घेत सीना नदी पात्रातील अतिक्रमणांवर हातोडा घालण्याची कारवाई महापालिकेच्या पथकामार्फत सुरू केलेली आहे. पहिल्या टप्प्यात नगर-पुणे रस्त्यावरील पूल ते वारूळाचा मारूती दरम्यान पात्रातील भराव उचलून, पिके, वीटभट्ट्या आदी अतिक्रमणे काढून नदी प्रवाहित करण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार पथकाकडूनआता दुसर्‍या टप्प्यातील कारवाई सुरू करण्यात आली आहे. काल काटवन खंडोबा रस्त्यावरील पुलानजिक असलेली आठ ते दहा लोखंडी टपर्‍या, पत्र्याचे शेड काढण्यात आले. त्याखाली बुजविण्यात आलेली गटार मोकळी करण्यात आली. 

त्यानंतर नवीन टिळक रस्त्याच्या बाजूने नदी पात्रात करण्यात आलेली मार्बल, फरशीचे दुकान, लाकडाच्या वखारी, गोदामे, गादी कारखाने, फळांच्या आढ्या, निवासी बांधकाम, अशी सुमारे 20 अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्रीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पथकाने दोन पोकलेनच्या साहाय्याने पोलिस व एसआरपीच्या बंदोबस्तात ही कारवाई केली. काटवन खंडोबा पूल ते नगर-पुणे रस्त्यावरील पूल या दरम्यान पात्रातील 70 ते 80 टक्के अतिक्रमणे काढण्यात आल्याचे इथापे यांनी सांगितले. गेल्या बारा दिवसांपासून सीना नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरू असून, सर्व अतिक्रमणे निघेपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे.