Tue, Nov 20, 2018 19:02होमपेज › Ahamadnagar › कर्ज वितरणात हलगर्जीपणा करणार्‍या बँकांवर कारवाई

कर्ज वितरणात हलगर्जीपणा करणार्‍या बँकांवर कारवाई

Published On: Jun 22 2018 2:09AM | Last Updated: Jun 21 2018 11:52PMनगर : प्रतिनिधी

बँकांनी सकारात्मक भूमिका ठेवून अधिकाधिक शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी वेळेत कर्ज उपलब्ध करुन द्यावे. कर्जवितरणात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणार्‍या बँकांविरोधात कडक कार्यवाही केली जाईल. या बँकांमधील  शासकीय ठेवी काढून घेतल्या जातील, असा इशारा  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात काल (दि.21) जिल्हाधिकारी  द्विवेदी यांनी सर्व बँकांच्या खरीप कर्ज वितरणाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा उपनिबंधक (सहकार) दिग्विजय आहेर, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी गायकवाड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक  गवळी यांच्यासह विविध बँकांचे जिल्हा व्यवस्थापक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.द्विवेदी यांनी प्रत्येक बँकांचा तपशीलवार आढावा घेतला. 1 एप्रिल ते 31 मे 2018 पर्यंत आणि त्यानंतर आजपर्यंत किती शेतकर्‍यांना बँकांनी कर्ज वितरित केले, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. अपवाद वगळता बहुतांश बँकांनी अद्यापि शेतकर्‍यांना कर्ज वितरणाबाबत वेगाने कार्यवाही केली नसल्याने, जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. जिल्हाभरातील सर्वच  बँकांनी त्यांच्या शाखांमध्ये कॅम्प आयोजित करुन शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. खरिप हंगामात शेतकर्‍यांना वेळेवर कर्ज उपलब्ध झाले नाही, तर त्याचा काय उपयोग, अशा शब्दांत त्यांनी बँक प्रतिनिधींना सुनावले. कर्ज वितरणात एका आठवड्यात सुधारणा करा. कर्जवितरण ही बाब गंभीरपणे घ्या, असे त्यांनी सांगितले.

गैरहजर प्रतिनिधींना नोटिसा बजावण्याचे आदेश

कर्ज मागणी प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित ठेवू नका. वेळेवर आणि तात्काळ त्यांना कर्ज उपलब्ध करुन द्या. बँका अशी कार्यवाही करतात की नाही, याची शहानिशा जिल्हा अग्रणी बँक अधिकार्‍यांनी  अचानक भेटी देऊन करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिले. या आढावा बैठकीस अनुपस्थित असणार्‍या बँक प्रतिनिधींना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश देखील त्यांनी जिल्हा अग्रणी बँक अधिकारी  गायकवाड यांना दिले.