Sat, Jul 20, 2019 23:33होमपेज › Ahamadnagar › डॉ. भिसेंवरील कारवाई राजकीय सुडातूनअ‍ॅड. आंबेडकर

डॉ. भिसेंवरील कारवाई राजकीय सुडातूनअ‍ॅड. आंबेडकर

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 12 2018 10:40PMजामखेड : प्रतिनिधी

धनगर आरक्षणाची मागणी करणारे डॉ. इंद्रकुमार भिसे व त्यांच्या सहकार्‍यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे राजकीय सुडातून आहेत. याला सत्ताधारी जबाबदार आहेत, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.अहिल्यादेवींचे जन्मस्थळ असलेले चौंडी हे गाव त्यांच्या विचारांचे प्रेरणास्थान आहे. मात्र या सरकारने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राजकीय भाषणांचे स्थळ निर्माण केले आहे. तसेच डॉ इंद्रकुमार भिसे यांच्यावर राजकीय आकसापोटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कार्यक्रमात गोंधळ घातल्याप्रकरणी दीड महिन्यापासून कारागृहात असलेल्या डॉ. इंद्रकुमार भिसे यांची अ‍ॅड. आंबेडकर यांनी काल (दि. 12) भेट घेतली.त्यानंतर अ‍ॅड. आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, चौंडी येथील 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी फक्त पत्रके भिरकावली. दगड मारणारे दुसरेच होते. तरी त्यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला. हे षडयंत्रच आहे. अगोदर डॉ. भिसे यांनी पंढरपूर येथे समाजाच्या मेळाव्यात आरक्षणाची मागणी केली होती. राजकीय आकसापोटीच गुन्हे दाखल केले. त्यांच्या जामिनासाठी आपण औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल केल्याचे सांगून त्यांना लवकरच जामीन मंजूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच आरक्षणा संबधी ते म्हणाले की, जो पर्यंत बहुजनांची सत्ता येणार नाही, तोपर्यंत बहुजन समाजाचे प्रश्‍न सुटणार नाहीत. धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण मिळावे, यासाठी मोठा लढा उभारावा लागणार आहे. आम्ही लोकसभेच्या 12 जागा मागत आहोत. त्या मिळाल्या नाही, तर स्वतंत्र निवडणुका लढणार आहोत. वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्यात आली आहे. सरकारने शेतकर्‍यांसाठी दीडपट हमीभावाची केलेली घोषणा फसवी आहे. हे सरकार मनमोहनसिंगांचा कित्ता गिरवत आहे.

भिडेंबाबत आंबेडकर म्हणाले की, मुख्यमंत्री भिंडेना पाठिशी घालत आहेत. डवरी गोसावी समाज धुळे प्रकारानंतर जागृती झाली आहे. या संदर्भात तातडीने मुख्यमंत्र्यांना भेटून या समाजाला परवाने देण्यात यावेत, तसेच रमाई आवास योजनेंतर्गत घरे व उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी भेटणार आहे.यावेळी नवनाथ पडळकर, अ‍ॅड. अरूण जाधव, प्रा. मधुकर राळेभात, तहसीलदार विशाल नाईकवडे, सुभाष  शिंदे, नीलेश गायकवाड, बापुसाहेब गायकवाड, दत्ता करे, उत्तमराव मदने, सुरज सोट, भाऊसाहेब कोरटकर, बापूसाहेब ओहोळ, अमित जाधव, विकीभाऊ सदाफुले, अरूण डोळस, सागर सदाफुले, संतोष गर्जे, धनराज पवार, अवधूत पवार, प्रा. विकी घायतडक, श्रीकांत कदम दादा मोरे विकास मासाळ, राजेश वाव्हळ, द्वारका पवार, रवि सोनवणे, मनिष घायतडक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.