Fri, Jul 19, 2019 05:25होमपेज › Ahamadnagar › सरपंचासह तिघांवर कारवाई प्रस्तावित!

सरपंचासह तिघांवर कारवाई प्रस्तावित!

Published On: Jun 11 2018 1:05AM | Last Updated: Jun 11 2018 1:05AMनगर : प्रतिनिधी

नागरदेवळे येथील एका महिलेचे नाव सात-बारा उतार्‍यावरून परस्पर कमी करण्यात आले होते. याप्रकरणी महिलेने विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर जिल्हा परिषदेने चौकशी सुरु केली होती. त्यानुसार गावच्या सरपंचासह दोन सदस्यांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांसमोर याची चौकशी सुरु होणार असून, दोषी आढळल्यास या तिघांवर निलंबनाची कारवाई होणार आहे.

उतार्‍यावरून परस्पर नाव कमी करत सरपंच सविता राम पानमळकर, ग्रामपंचायत सदस्य शरद आनंदराव गायकवाड व सूर्यकांत चंद्रकांत पाखरे यांनी कर्तव्यात कसूर केला. त्यामुळे त्यांची विभागीय चौकशी करून कारवाई करण्यात यावी, असे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांनी विभागीय आयुक्तांना पाठविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील संकल्प कॉलनी येथे बाबासाहेब जरे यांचे घर आहे. त्यांनी ग्रामपंचायतीकडे त्यांच्या पत्नी छाया यांचे नाव सात-बारा उतार्‍यावरून कमी करण्याचा अर्ज दिला होता. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत हा विषय घेऊन छाया जरे यांचे नाव कमी करण्यात आले. मात्र नाव कमी करतान छाया जरे यांना त्याबाबत कुठलीही कल्पना देण्यात आली नाही. 

नाव कमी केल्याची माहिती मिळताच छाया जरे यांनी ग्रामपंचायतीत जाऊन नाव पुन्हा उतार्‍यावर लावण्याची मागणी केली. त्यावर ग्रामसभेत तुमच्या विषयावर चर्चा करण्यात येईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. 31 मे रोजी झालेल्या ग्रामसभेत छाया जरे यांनी नाव लावण्याची विनंती केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी तेथेच विष प्राशन केले. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर नगर पंचायत समितीतर्फे गटविकास अधिकार्‍यांतर्फे या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यात प्रथम दर्शनी सरपंच सविता राम पानमळकर, ग्रामपंचायत सदस्य शरद आनंदराव गायकवाड, सूर्यकांत चंद्रकांत पाखरे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा अहवाल जिल्हा परिषदेस दिला. त्यानुसार त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) नुसार कारवाई करण्याकामी चौकशी आदेश मिळण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.